'कांतारा चाप्टर १'ची उत्सुकता शिगेला आहे. 'कांतारा' सिनेमाला मिळालेल्या भव्य यशानंतर 'कांतारा चाप्टर १'मध्ये काय पाहायला मिळणार याबद्दल सर्वांमध्ये चर्चा आहे. ऋषभ शेट्टी सध्या 'कांतारा चाप्टर १'चं शूटिंग करतोय. काही महिन्यांपूर्वी ऋषभने 'कांतारा चाप्टर १'चा छोटासा टीझर दाखवल्यापासूनच या सिनेमाची सध्या चांगलीच हवा आहे. अशातच 'कांतारा चाप्टर १'साठी ऋषभ शेट्टी कदंब साम्राज्याचा सेट उभारतोय. त्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळतेय.
'कांतारा चाप्टर १'साठी ऋषभची जय्यत तयारी
'कांतारा चाप्टर १' हा एक अद्भत प्रकारचा अनुभव असणार यात शंका नाही. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळावर आधारलेला आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते. त्यांनी या प्रदेशातील वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे.
८० फूटांचा सेट आणि बरंच काही
'कांतारा चाप्टर १'च्या निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले असून चित्रपटासाठी संपूर्ण स्टुडिओ तयार करण्यापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला, त्यांनी एक विस्तृत सेटिंग तयार करण्यासाठी ८० फूट उंचीचा एक भव्य सेट शोधला परंतु त्यांना योग्य काहीही सापडले नाही. त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधून सेट उभारला आहे. कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. 'कांतारा चाप्टर १'साठी तो काळ पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे.