RRR सिनेमा कोणाला माहित नाही असा भारतीय सापडणं दुर्मिळच. RRR सिनेमाने भारतात विक्रमी कमाई केलीच शिवाय थेट ऑस्करपर्यंत मजल मारली. RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करमध्ये पुरस्कार मिळाला. या गाण्याची इतकी क्रेझ आहे की जगभरातले लोकं या गाण्यावर थिरकले. नुकतंच RRR सिनेमाने जपानमध्ये एक नवीन विक्रमच प्रस्थापित केलाय. काय घडलं पाहा.
RRR च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विट समोर आले आहे. चाहत्यांना कळवण्यात आले आहे की, जपानमधील 'RRR' शोची सर्व तिकिटे 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत विकली गेली आहेत. आता समोर आलेल्या या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'जपानमध्ये RRR रिलीज होऊन जवळपास दीड वर्षे झाली आहेत. तेव्हापासून हा चित्रपट आजही चित्रपटगृहात सुरू आहे. 18 मार्चच्या शोची सर्व तिकिटे एका मिनिटापेक्षा कमी वेळात विकली गेली.' हे ट्विट पाहून आता चाहत्यांनाही सुखद धक्का बसलाय.
RRR चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली १८ मार्चला जपानमध्ये चित्रपटाच्या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या शोच्या स्क्रिनिंगसाठीच बुकिंग सुरू करण्यात आली होती. आणि अल्पावधीत ही बुकींग हाऊसफुल्ल झाली. अशाप्रकारे RRR रिलीज होऊन २ वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असला तरीही सिनेमाची क्रेझ अजुन कमी झाली नाही, हे तितकंच खरं.