अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली. होय, सुपरस्टार प्रभासचा 'सालार' या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. अंगावर शहारे आणणारा हा दमदार ट्रेलर आहे. जबरदस्त अॅक्शन स्टंटशिवाय या चित्रपटात अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील, याचा अंदाजही ट्रेलर पाहिल्यानंतर येतो.
'सालार' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात "बचपन में मैं तुम्हें एक कहानी सुनाता था" या डायलॉगनं होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये काही अॅक्शन सीन्स दिसतात. 'सालार' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रभाससोबतच श्रुती हसन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची देखील झलक पाहायला मिळते. श्रुती हासनच्या पात्राचे नाव आद्या तर पृथ्वीराज सुकुमारनच्या पात्राचे नाव हे वर्धराज आहे.
ट्रेलरच्या शेवटी 'खानसार की कहानी तब बदली जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए"' हे वाक्य ऐकू येतं. 'सालार'मध्ये दोन मित्रांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे, जे आधी जवळचे मित्र होते आणि नंतर कट्टर शत्रू बनले. आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी प्रशांतने 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 2 तास आणि 55 मिनिटे एवढा रनटाइम असलेला हा चित्रपट तेलुगु, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रभासचा 'सालार' हा बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाला टक्कर देणार आहे.