दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) कायम तिच्या सिनेमांमुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत येत असते. यात अलिकडेच तिने तिच्या पॉडकास्टमध्ये तिच्याविषयीचे खुलासे केले. यात तिने, ती अध्यात्माच्या मार्गावर जात असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर या पॉडकास्टमध्ये तिने नागाचैतन्यसोबत घेतलेल्या घटस्फोटावरही भाष्य केलं. एका युजरने तिला नागाचैतन्यसोबत (naga chaitanya) झालेल्या घटस्फोटाविषयी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं तिने ज्या प्रकारे उत्तर दिलं त्याचं सध्या नेटकरी कौतुक करत आहेत.
2021 मध्ये समंथा आणि नागा चैतन्य कायदेशीररित्या विभक्त झाले. दोघांनीही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. परंतु, तरीदेखील अनेकांनी समंथाला ट्रोल केलं. समंथाने नागा चैतन्यची फसवणूक केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी तिच्यावर केला. तिच्या पॉडकास्टमध्येही एका युजरने तिला याचसंदर्भात प्रश्न विचारला. त्याचं उत्तर समंथाने दिलं आहे.समंथा तिच्या पॉडकास्टमध्ये मेडिटेशन, हिलिंग आणि थेरपी याविषयी भाष्य करत होती. याच व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने तिला मुद्दामून खोचक प्रश्न विचारला. याचं उत्तर समंथाने दिलं आहे.
'मला सांगा, तू तुझ्या निर्दोष पतीची फसवणूक का केलीस?' असा प्रश्न या युजरने तिला विचारला. त्यावर, "माफ करा. पण, याविषयीचा अभ्यास करुन तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. तुम्हाला तुमच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा गोष्टी शिकायची गरज आहे. तुमच्या भावी काळासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा", असा रिप्लाय समंथाने या युजरला दिला.
दरम्यान, समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट कलाविश्वात प्रचंड चर्चेत राहिला. या घटस्फोटानंतर समंथाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला होता. ज्यामुळे या सगळ्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. परंतु, या सगळ्यातून समंथा आता बाहेर पडतांना दिसत आहे.