Join us  

अबोली गजरा अन् पारंपरिक साज, शोभिता धुलिपाला-नागा चैतन्यचा थाटामाटात साखरपुडा, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 1:57 PM

अखेर आज नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांनी साखरपुडा केला असून सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलंय (sobhita dhulipala, naga chaitanya)

बॉलिवूड आणि साऊथ सिनेमे गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य आज साखरपुडा करणार या चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चा खऱ्या असल्याचं सिद्ध झालंय. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांनी एकमेकांशी पारंपरिक थाटामाटात साखरपुडा केलाय. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये पारंपरिक रितीरिवाजानुसार शोभिता-नागा चैतन्यने साखरपुडा केल्याचं पाहायला मिळतंय. 

पांरपरिक अंदाजात सजले नागा चैतन्य - शोभिता

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतंय की शोभिता आणि नागा चैतन्य पारंपरिक अंदाजात सजलेले दिसत आहेत. फिकट गुलाबी रंगाची साडी आणि केसात अबोली गजरा या पारंपरिक अंदाजात शोभिता नटलेली दिसतेय. तर नागार्जुनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि उपरणं परिधान केलेलं दिसतंय. दोघांचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

नागार्जुनने केलं होणाऱ्या सुनेचं स्वागत

नागा चैतन्यचे वडील आणि सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर लेकाचे साखरपुड्याचे फोटो शेअर करत होणाऱ्या सुनेचं स्वागत केलं. नागार्जुन लिहितात, "आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की माझा मुलगा नागा चैतन्यने सकाळी ९.४२ च्या मुहुर्तावर शोभिता धुलीपालासोबत साखरपुडा केलाय. शोभिताला आमच्या कुटुंबात सहभागी करताना आम्हाला आनंद होतोय. या जोडप्याचं खूप अभिनंदन! त्यांच्या आयुष्यात आनंद आणि प्रेमाचा वर्षाव राहो." 

नागाने याआधी अभिनेत्री समंथाशी केलेलं लग्न

सांगायचं झालं तर, नागा चैतन्यने याआधी साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथासोबत लग्न केलं होतं. २०१७ मध्ये मोठ्या थाटामाटात या दोघांनी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट घेत ते वेगळे झाले. २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं. समांथा आणि नागा चैतन्यकडे साऊथ सिनेसृष्टीतील आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 

टॅग्स :नागार्जुनबॉलिवूडसमांथा अक्कीनेनी