साऊथ सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कालच अभिनेता शिहान हुसैनी यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर मंगळवारीच अभिनेता आणि दिग्दर्शक मनोज के. भारतीराजा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ते ४८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. यातून ते बरे होत होते. मात्र २५ मार्चला चेन्नईमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हार्ट अटॅक आला आणि राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. सोशल मीडियावरुन त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे.
मनोज भारतीराजा हे तमिळ इंडस्ट्रीतील दिग्दर्शक भारतीराजा यांचे पुत्र होते. वडिलांचं दिग्दर्शन असलेल्या 'ताज महल' या तमिळ सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'ईरा नीलम', 'वरुशामेल्लम वसंतम' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. प्राइम व्हिडिओच्या स्नेक अँज लॅडर्स या वेब सीरिजमध्येही ते झळकले होते. अभिनेता असण्यासोबतच त्यांनी काही सिनेमांचं दिग्दर्शनही केलं होतं.
मनोज यांच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीही मनोज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याबरोबरच अनेक नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.