Prakash Raj: साऊथ इंडस्ट्रीपासून ते हिंदी सिनेसृष्टीत अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण केला आहे. साऊथमध्ये तर त्यांची लोकप्रियता आहेच पण अजय देवगण, रोहित शेट्टीच्या सिंघम सिनेमात त्यांनी केलेला अभिनय पााहून बॉलिवूडही त्यांच्या प्रेमात पडलं. प्रकाश राज त्यांच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असतात. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रकाश राज यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले.
नुकतीच प्रकाश राज यांनी एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी आयुष्यातील कठीण प्रसंगावर भाष्य केलं. मुलाखतीत प्रकाश राज यांनी ५ वर्षाच्या मुलाला गमावल्यानंतर ते पूर्णपणे खचले होते, असं ते म्हणाले. "मी स्वार्थी नाही होऊ शकत. कारण मला माझ्या कुटुंबीयांसोबत माझी इमेजही जपायची आहे".
पुढे ते म्हणाले, "मी दु:खाला कवटाळून बसण्यापेक्षा आनंदी जीवन कसं जगता येईल याकडे लक्ष देतो, कारण यामुळे मनातील दु:ख कमी होण्यास मदत होते. काही गोष्टी आपल्याला विसरता येत नाही. त्यांचे घाव मनावर कायम कोरले गेलेले असतात. त्यांना सोबत घेऊनच आयुष्य जगावं लागतं".
नेमकं काय घडलेलं
एकेदिवशी पतंग उडवताना त्यांचा ५ वर्षीय मुलगा सिद्धू (सिद्धार्थ) पडला. त्याला इतका गंभीर मार लागला की डॉक्टरही वाचवू शकले नाहीत. प्रकाश राज यांनी शेतातच मुलाच्या पार्थिवाला अग्नी दिला. ते म्हणाले होते की, 'मी अनेकदा तिकडे जातो तेव्हा मला हतबल झाल्यासारखे वाटतं.' सिद्धूच्या मृत्यूनंतर प्रकाश राज आणि पत्नी ललिता यांच्यात मतभेद सुरु झाले. दरदिवशी दोघांमध्ये काही ना काही कारणाने वाद होत होते. परिणामी त्यांचा २००९ साली घटस्फोट झाला.