साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) करिअर ग्राफ सध्या जोरात आहे. त्याचा 'खुशी' (Khushi) सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. समंथासोबतची (Samantha) त्याची केमिस्ट्री पसंत केली जात आहे. सिनेमाला मिळालेलं यश पाहता विजयने घेतलेल्या एका निर्णयाचं खूप कौतुक होत आहे. १०० कुटुंबियांसाठी तो सिनेमाच्या कमाईतून एकूण १ कोटी रुपये देणार आहे. प्रमोशनदरम्यान त्याने नुकतीच ही घोषणा केली आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
'खुशी' सिनेमाच्या यशानिमित्त विशाखापट्टणममध्ये ४ सप्टेंबर रोडी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सिनेमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल विजयने चाहत्यांचे आभार मानले. सिनेमाच्या कमाईतून गरजू कुटुंबाना १ कोटी रुपये देणार असल्याची त्याने घोषणा केली. तो म्हणाला, 'मला चाहत्यांसोबत खुशी साजरी करायची आहे. मी १०० कुटुंबाना प्रत्येकी १ लाख रुपयांचा चेक देणार आहे. या कुटुंबांची यादी आज जारी करण्यात येईल.'
विजय पुढे म्हणाला, 'प्रेक्षक आणि चाहत्यांमुळेच आज आम्हाला एवढं यश मिळत आहे. माझे चित्रपट सफल व्हावे असं तुम्हाला सगळ्यांनाच वाटतं. जर माझे चित्रपट फ्लॉप झाले तर त्यांना दु:ख होतं. मी या स्टेजवरुन सांगतो, की मी माझ्या कुटुंबासोबतच १०० टक्के काम तुमच्यासाठीही करेन. तुम्ही नेहमी हसत राहा. मी तुम्हा सगळ्यांसोबतच खुशी साजरी करु इच्छितो. मला तुमचं हसू पाहायचं आहे त्यामुळे काहीतरी करावंच लागेल. मी तुम्हा सगळ्यांना वैयक्तिक भेटू शकत नाही. मी लवकरच १०० कुटुंबांची यादी तयार करुन त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा चेक देणार आहे. कमाईसोबतच माझा आनंदही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.'
'मी सोशल मीडियावरुन एक फॉर्म पोस्ट करणार आहे. मी काही कोणती योजना घेऊन आलेलो नाही. या फॉर्मचं नाव 'स्प्रेडिंग खुशी' किंवा 'देवरा फॅमिली' असं ठेवेन. या पैशातून कोणी भाडं, फीस या गोष्टींची भरपाई करु शकत असतील तर मला आनंदच होईल. १० दिवसात हैदराबादमध्ये आपण 'खुशी'च्या यशाचा जल्लोष करुया. त्याआधी मी हे वचन पूर्ण करणार आहे. कुटुंबाची मदत केली की तरच मला यशाचा आनंद घेता येईल.'