दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन(सीबीएफसी)वर विशालने चित्रपटाला सर्टफिकेट देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला आहे. 'मार्क एंटनी' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी सेन्सॉर बोर्डाला ६.५ लाखांची लाच दिल्याचं विशालने म्हटलं आहे. याबाबत विशालने एक ट्वीट केलं आहे.
"मोठ्या पडद्यावर भ्रष्टाचारासारखा मुद्दा उचलणं ठीक आहे. पण, खऱ्या आयुष्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच भ्रष्टाचार करणं चुकीचं आहे. पण, सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये हेच होत आहे. मलादेखील मार्क एंटनी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ६.५ लाख रुपये द्यावे लागले," असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
विशालने हे पैसे कोणाला आणि कसे दिले, याचाही लेखाजोगा ट्वीटमध्ये मांडला आहे. पहिले तीन लाख आणि नंतर साडेतीन लाख रुपये सेंन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना बँक ट्रान्सफर केल्याचं विशालने म्हटलं आहे. ट्वीट केलेल्या व्हिडिओत सेन्सॉर बोर्डाने दुसरा कोणताच पर्याय ठेवला नसल्याचं विशालने म्हटलं आहे.
"आम्ही चित्रपटाला सर्टिफिकेट मिळण्यासाठी सेन्सॉर बोर्डात अर्ज केला होता. पण, शेवटच्या क्षणी त्याला सर्टिफिकेट नाकारण्यात आलं. या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ६.५ लाख रुपये मागितले. दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे मी त्यांना पैसे दिले. पैसे बँक ट्रान्सफर करायचे असं मी मॅनेजरला सांगितलं होतं," असं विशालने व्हिडिओत म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टॅग करून या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं आहे. मार्क एंटनी हा एक तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात विशाल दुहेरी भूमिकेत आहे.