Join us

'जय श्री राम' लिहित नयनताराने मागितली माफी, 'अन्नपूर्णी' सिनेमामुळे पेटला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 8:42 AM

अभिनेत्री नयनताराने इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिले...

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराचा (Nayanthara) काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला 'अन्नपूर्णी' (Annapoorni) सिनेमा वादात अडकला. सिनेमात प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह संवाद आढळून आल्याने वाद पेटला होता. हा वाद इतका पेटला की नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन सिनेमा काढला गेला. सिनेमासंबंधित लोकांवर FIR देखील दाखल झाली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री नयनतारावरही आरोप झाले. आता नयनताराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. 

अभिनेत्री नयनताराने इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिले,'ओम! जय श्रीराम! मी हे अतिशय जड अंत:करणाने आणि स्वच्छ मनाने लिहित आहे. आमच्या अन्नपूर्णी सिनेमामुळे गेल्या काही दिवसांपासून जो वाद झाला आहे त्यापार्श्वभूमीवर मी सर्व देशवासियांना संबोधित करु इच्छिते. कोणताही सिनेमा हा केवळ आर्थिक फायद्यासाठी बनत नाही तर त्यातून समाजाला संदेश देण्याचाही हेतू असतो. हेच मी अन्नपूर्णबाबतही सांगू इच्छिते की हा सिनेमा त्याच भावनेतून बनवण्यात आला आहे. समाजाला आरसा दाखवणे आणि दृढ इच्छाशक्तीने आलेल्या अडचणी दूर करणे हाच त्याचा उद्देश आहे. 

प्रामाणिकपणे एक सकारात्मक संदेश पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. मात्र त्यामुळे नकळतपणे तुमच्या भावना दुखावल्या. आम्हाला मुळीच ही कल्पना नव्हती की आधी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या सेन्सॉरमान्य सिनेमाला ओटीटीवरुन काढण्यात येईल. माझा आणि माझ्या टीमचा हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणे हा मुळीच नव्हता. मी नकळतपणेही असा विचार करु शकत नाही कारण माझी स्वत:ची देवावर श्रद्धा आहे. मी भारतभ्रमण करताना तेथील मंदिरांमध्ये जाऊन आवर्जुन दर्शन घेते. या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करता ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्या सर्व लोकांची मी मनापासून माफी मागते.

'अन्नपूर्णी'चा उद्देश लोकांना त्रास देणे नव्हता तर केवळ समाजप्रबोधन आणि प्रेरणा देणे हा होता.

गेल्या दोन दशकांपासून मी सिनेइंडस्ट्रीत केवळ एकाच उद्देशाने काम करत आहे ते म्हणजे सकारात्मकता पसरवणे आणि एकमेकांकडून चांगल्या गोष्टी घेणे. 

नयनताराच्या या माफीनाम्यानंतर आता हा वाद शांत होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नयनताराच्या चाहत्यांनी मात्र तिची बाजू घेत या माफीनाम्याची गरज नव्हती अशा कमेंट केल्या आहेत. नयनताराने शाहरुखच्या खानच्या 'जवान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये शाहरुखसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. तिच्या पुढील हिंदी सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :नयनताराTollywoodनेटफ्लिक्ससोशल मीडिया