Join us  

क्या बात! पत्नीचं नाव आणि आडनाव लावणार, लग्नानंतर दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या पतीचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 3:46 PM

अभिनेत्रीच्या पतीने लग्नानंतर तिचं नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात वरलक्ष्मीचा पती निकोलाई यांनी याबाबत भाष्य केलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार विवाहबंधनात अडकली.  वरलक्ष्मीने व्यावसायिक निकोलाई सचदेव यांच्याबरोबर सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. एकीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच वरलक्ष्मी आणि निकोलाई यांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर वरलक्ष्मीचा पती निकोलाईने मोठा निर्णय घेतला आहे. 

निकोलाई यांनी लग्नानंतर अभिनेत्रीचं नाव आणि तिच्या वडिलांचं नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर लग्नानंतर मुलीचं नाव बदलण्याची भारतात पूर्वीपासून प्रथा आहे. आता मुली आणि अनेक अभिनेत्रीदेखील लग्नानंतर माहेरच्या नावापुढे सासरचं नाव जोडतात. पण, आता अभिनेत्रीच्या पतीने लग्नानंतर तिचं नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात वरलक्ष्मीचा पती निकोलाई यांनी याबाबत भाष्य केलं आहे. 

"लग्नानंतर वरलक्ष्मीने तिचं नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिला तिच्या नावातून सरथकुमार काढून टाकायचं नव्हतं. पण, तिला तिच्या नावात सचदेव लावायचं होतं. पण, तिचं नाव हे वरलक्ष्मी सरथकुमार असंच राहील. मी माझं नाव बदलत आहे. आता मी 'निकोलाई वरलक्ष्मी सरथकुमार सचदेव' या नावाने ओळखला जाईन. माझी मुलगी(पहिल्या पत्नीपासून असलेली) देखील हेच नाव लावणार आहे. यामुळे वरलक्ष्मी आणि अभिनेते सरथकुमार यांचा वारसा कायम राहील. हे मी माझ्या पत्नीसाठी करत आहे", असं निकोलाई यांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले, "मी तिला खूप वर्षांपासून ओळखतो. तिने माझ्याशी लग्न केलेलं असलं तरी मी तिचं पहिलं प्रेम नाही. तिच पहिलं प्रेम हे सिनेमा आहे. त्यानंतर मी येतो. लग्नानंतरही ती तिचं करिअर आणि काम चालू ठेवेल". वरलक्ष्मी आणि सचदेव यांनी थायलंडमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह केला. दाक्षिणात्य पद्धतीने वरलक्ष्मी आणि सचदेव लग्नाच्या बेडीत अडकले. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित त्यांचा लग्नसोहळा पार पडला. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसेलिब्रेटी वेडिंग