दाक्षिणात्य निर्माते, फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन दिल राजू (Dil Raju) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. नुकताच त्यांनी रामचरण तेजाला घेऊन 'गेम चेंजर' सिनेमा बनवला. ४५० कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार झाला. दिल राजू यांच्या मुलीच्या घरीही आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. घरासोबत दिल राजू यांच्या ऑफिसमध्ये झडती सुरु आहे.
फिल्ममेकर दिल राजू यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडल्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टी आता चर्चेत आली आहे. हैदराबाद येथईल ८ वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई होत आहे. अद्याप अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दिल राजू यांचं खरं नाव वेलमकुचा वेंकट रमना रेड्डी आहे. ते तेलुगु फिल्म डिस्ट्रिब्युटर आणि निर्माते आहेत. नुकताच त्यांचा 'गेमचेंजर' सिनेमा रिलीज झाला. रामचरण तेजा आणि कियारा अडवाणी यामध्ये मुख्य भूमिकेत होते. याचं बजेट तब्बल ४५० कोटी होतं. दिल राजू यांनी याआधीही अनेक बिग बजेट सिनेमे प्रोड्युस केले आहेत. महर्षि, जानू, वी, वकील साहब, वारिसु,फॅमिली स्टार यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत दिल राजू
२०१६ साली आलेल्या 'सतनाम भवती' आणि २०१९ साली 'महर्षि' सिनेमासाठी दिल राजू यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांच्या नावावर अनेक फिल्मफेअर पुरस्कारही आहेत.