दाक्षिणात्य अभिनेता मंसूर अली खान सध्या चर्चेत आहे. मंसूरने अभिनेत्री तृषा कृष्णनबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अभिनेत्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता यावर सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांनी भाष्य केलं आहे. चिंरजीवींनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या थलापती विजयच्या 'लिओ' सिनेमात मंसूर अली खान आणि तृषाही झळकले आहेत. यामध्ये तृषाबरोबर एक सीन करण्याबाबत मंसूरने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचाय त्यावेळी मी मला वाटलं की हा एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी यापूर्वीही अनेक बलात्काराचे सीन शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. परंतु, काश्मीरमध्ये शूटिंग सुरु असताना मला तृषाला पाहायला सुद्धा दिलं नाही", असं मंसूर अली खान म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर तृष्षाने संताप व्यक्त केला होता. आता चिरंजीवींनी यावर नाराजी व्यक्त करत अभिनेत्याला सुनावलं आहे.
"तृषाबाबत मंसूने केलेलं वक्तव्य निंदनीय आहे. एका अभिनेत्रीसाठीच नाही तर असं वक्तव्य हे कोणतीही मुलगी आणि स्त्रीसाठी किळवाणं आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. यातून विकृतीची दुर्गंधी येते. मी तृषा आणि त्या प्रत्येक मुलीच्या बरोबर उभा आहे ज्यांना अशा वक्तव्याचा सामना करावा लागतो," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मंसूर अली खानच्या वक्तव्यावर तृषा काय म्हणाली?
"नुकताच एक व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला आहे. ज्यात मंसूर अली खानने माझ्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि वाईट भाषेत भाष्य केलं आहे. मी याचा तीव्र विरोध करते. त्याची ही टिप्पणी स्त्रीविरोधी, अपमानकारक, अत्यंत वाईट आणि तिरस्कार करण्याजोगी आहे. त्याने माझ्यासोबत काम करण्याचं स्वप्न पाहात रहावं. पण, अशा वाईट व्यक्तीसोबत मी स्क्रीन शेअर केली नाही यासाठी मी फार आभारी आहे. आणि, माझ्या उर्वरित करिअरमध्येही मी त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही. त्याच्यासारखे लोक माणुसकीला बदनाम करतात."