Join us

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 2:17 PM

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला पोलिसांकडून अटक, हत्या केल्याचा आरोप

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. कन्नड फिल्म स्टार दर्शन यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका मर्डर केसमध्ये ही अटक झाल्याची माहिती मिळत आहे. ९ जून रोजी दर्शन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई करत दर्शन यांना मैसूर येथील त्यांच्या फार्महाऊसमधून अटक केली. रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

एएनआईने दिलेल्या वृत्तानुसार, मर्डर केसमध्ये पोलीस दर्शन यांची चौकशी करत आहेत. रेणुकास्वामी मर्डर केसमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीने दर्शन यांचं नाव घेतलं आहे. त्याबरोबरच मृत व्यक्तीच्या आईनेही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात सध्या बंगळूरू येथे त्यांची चौकशी पोलीस करत आहेत. 

याबाबत बंगळूरू पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. पोलीस आयुक्त बी. दयानंद म्हणाले, "९ जून रोजी बंगळूरू पश्चिम येथील कामाक्षीपाल्या पोलीस स्थानकात एक हत्या झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणात कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी आम्ही करत आहोत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे". याप्रकरणी १० जणांना ताब्यात घेतल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.  यामध्ये अभिनेत्याच्या पत्नीचाही समावेश आहे.

दर्शन यांनी १९९७ साली महाभारत मधून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यांनी कॅमेरामॅन म्हणूनही काम केलं आहे. सुरुवातीला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका वाट्याला आलेल्या दर्शन यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. नम्मा प्रितिया, कलासीपाल्या, गाजा, सारथी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 

टॅग्स :Tollywoodगुन्हेगारी