साऊथ सुपरस्टार आणि डीएमडीके पक्षाचे प्रमुख विजयकांत यांचं गुरुवारी(२८ डिसेंबर) करोनाने निधन झालं. श्वसनाच्या त्रासामुळे ते काही दिवस व्हेंटिलेटरवर होते. अखेर १४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. पण, विजयकांत यांचं निधन करोनाने झालं नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा प्रसिद्ध दिग्दर्शकाने केला आहे.
मल्याळम दिग्दर्शक अल्फोंस पुथ्रेनने विजयकांत यांच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे चाहतेही संभ्रमात आहेत. अल्फोंसने युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टालिन यांना टॅग करत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने विजयकांत यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. "मी तुम्हाला भेटण्यासाठी केरळला आलो होतो. आणि तुम्हाला राजकारणात येण्याविषयीही बोललो होतो. तेव्हा मी तुम्हाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांची हत्या कोणी केली? जयललिता यांची हत्या कोणी केली? याबाबत विचारलं होतं. आता विजयकांत यांची हत्या कोणी केली, याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे त्यांनी पोस्टमध्ये "जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर मी तु्म्हाला सांगू इच्छितो की त्यांनी कमल हसन आणि तुमचे वडील एम के स्टालिन यांच्यावरही हल्ला केला होता. जर तुम्ही या हत्याऱ्यांना पकडलं नाही तर पुढचं टार्गेट तुम्ही किंवा स्टालिन सर असाल," असंही म्हटलं आहे. अल्फोंस यांच्या या पोस्टबाबत अद्याप कोणाकडूनही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, त्यांच्या या पोस्टमुळे विजयकांत यांची हत्या झाली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.