पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA)लागू करत असल्याची घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. भाजपाचं सरकार आल्यानंतर ११ डिसेंबर २०१९ रोजी संसदेत कायदा पारित झाला होता. आता यावर साऊथ सुपरस्टार थलपति विजयने (Thalapathi Vijay) नाराजी दर्शवली असून हा हा कायदा अमान्य केला आहे.
तमिळ अभिनेता आणि तमिलागा वेट्री कडगम (टीवीके) चा प्रमुख थलपति विजयने नागरिकत्व दुरुस्ती कायदा अमान्य करत तमिळनाडू सरकारला राज्यात कायदा लागू न करण्याची विनंती केली. त्याने पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लिहिले, ' जिथे देशात सर्व नागरिक सामाजिक सद्भावनेने राहतात तिथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा सारख्या कोणत्याही कायद्याचा स्वीकार होऊ शकत नाही. सर्व नेत्यांनी देशात कायदा लागू होऊ नये हे सुनिश्चित केलं पाहिजे. तमिळनाडूतही कायदा लागू करु नका.'
२ फेब्रुवारी रोजी थलपति विजयने अधिकृतरित्या राजकीय पक्ष तमिळनाडू वेट्री कडगमची घोषणा केली. तसंच 2024 ची निवडणूक लढवणार नाही असंही जाहीर केलं. सामान्य आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला असल्याचंही त्याने सांगितलं. तमिळ लोकांनीच मला सर्वकाही दिलं आणि आता त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्याने तमिळ जनतेचे आभार मानले.