विजय सेतुपती हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटातही सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. 'मास्टर', 'विक्रम', '९६', 'सुपर डिलक्स', 'डीएसपी' अशा हिट चित्रपटांत काम केलेला सेतुपती श्रीलंकेच्या क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करणार होता. त्याने चित्रपटाची ऑफरही स्वीकारली होती. परंतु, नंतर त्याने चित्रपटातून माघार घेतली. आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे.
'८००' या श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकची सेतुपतीला ऑफर होती. या चित्रपटात तो मुरलीधरनची भूमिका साकारणार होता. परंतु, राजकीय नेत्यांच्या दबावामुळे सेतुपतीने हा चित्रपट न करण्याचं ठरवलं, असा खुलासा एका मुलाखतीत मुरलीधरनने केला आहे. झुम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मुरलीधरन म्हणाला, "आयपीलए सुरू असताना मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्याच हॉटेलमध्ये सेतुपतीही होता. माझ्या दिग्दर्शकाने मला ही गोष्ट सांगितली. मी त्याचा चाहता आहे. त्यामुळे त्याने मला भेटण्यास नकार दिला नाही. माझ्या बायोपिकची स्क्रिप्ट त्याने पाच दिवसांनंतर वाचली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याने या चित्रपटासाठी होकार देत अशी संधी मला सोडायची नसल्याचं सांगितलं होतं."
"पण, काही राजकीय नेत्यांकडून त्याला माझी भूमिका साकारण्याबाबत धमक्या येत होत्या. माझ्यामुळे त्याच्या करिअरवर परिणाम व्हावा, असं मला वाटत नव्हतं. '८००' हा एक स्पोर्ट्स चित्रपट आहे आणि याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही," असंही पुढे मुरलीधरन म्हणाला. विजय सेतुपतीने चित्रपटासाठी नकार दिल्यानंतर आता स्लमडॉग मिलेनियर फेम मधुर मित्तल मुरलीधरनच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला तमिळ, इंग्रजी, सिंहलीसह अनेक भाषांत प्रदर्शित करण्यात येणार आहे.