सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहे. मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या रजनीकांत यांना साऊथमध्ये देवाचा दर्जा दिला जातो. रजनीकांत यांनी आपल्या करिअरमध्ये एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. थलायवाचा आजही बोलबाला कायम आहे. रजनीकांत हे चित्रपटांसोबतच अध्यात्मावर भर देताना दिसून येतात.
रजनीकांत हे अध्यात्मिक यात्रेला निघाले आहेत. ७३ वर्षीय रजनीकांत केदारनाथ आणि बद्रीनाथला दर्शनाला निघाले आहेत. उत्तराखंडमधील डेहराडून येथून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. डेहराडून विमानतळावर रजनीकांत यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'दर वर्षी मला नवीन अनुभव येत असतात, मी माझा आध्यात्मिक प्रवास पुन्हा पुन्हा सुरू ठेवणार आहे. यावेळीही मला नवे अनुभव मिळतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एवढंच नाही तर रजनीकांत यांनी अध्यात्म का महत्त्वाचे आहे, हेही सांगितलं. ते म्हणाले, 'संपूर्ण जगाला अध्यात्माची गरज आहे, कारण अध्यात्म प्रत्येक माणसासाठी महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक असणे म्हणजे शांतता अनुभवणे आणि मुळात यात देवावर विश्वास ठेवणे समाविष्ट आहे'. नुकतेच रजनीकांत हे दुबईला गेले होते. तेव्हा त्यांनी अबुधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराला भेट दिली. याचे काही फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ते 'लाल सलाम' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. लवकरच ते अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'थलाइवर 170' मध्येही हे दोन सुपरस्टार एकत्र पाहायला मिळणार आहेत.रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.