Join us

'मिल्क ब्युटी' साध्वीची भूमिका करु शकते का? पत्रकाराच्या प्रश्नावर तमन्ना भाटियाचं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:49 IST

तमन्ना भाटिया आगामी 'ओडेला २' मध्ये झळकणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.

तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) तिच्या सौंदर्याने सर्वांनाच प्रेमात पाडलं आहे. तिची एकूणच फिगर, तजेलदार त्वचा यामुळे ती बॉलिवूडची 'ब्युटी क्वीन' बनली आहे. तिच्या 'आज की रात' या 'स्त्री २' मधील आयटम साँगने तर कमालच केली. यात तिच्या डान्स कौशल्याचंही खूप कौतुक झालं. तमन्नाने नुकतीच काही साध्वींची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. ती आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. तेव्हा पत्रकाराच्या एका प्रश्नावर तिने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

तमन्ना भाटिया आगामी 'ओडेला २' मध्ये झळकणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथे तिने काही साध्वींसोबत अध्यात्मिक संवाद साधला. या सर्व साध्वी महादेवाची भक्ती करतात आणि महादेवाच्या चरणीच त्यांनी आयुष्य समर्पित केलं आहे. कार्यक्रमावेळी एका पत्रकाराने तमन्नाला विचारलं, 'एक मिल्क ब्युटी शिवा शक्तीची म्हणजेच साध्वीची भूमिका करु शकते का?'

पत्रकाराच्या प्रश्नावर तमन्ना लगेच म्हणाली, "तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर लपलेलं आहे. 'मिल्क ब्युटी'कडे लाज वाटण्यासारखं बघू नका. महिला ग्लॅमरसही दिसू शकते यात काही वाईट नाही. याचा गर्वच वाटायला हवा. जोपर्यंत आपण स्वत:लाच सम्मानाने वागवणार नाही तोपर्यंत इतरांकडून आदराची आशा कशी काय करणार?"

ती पुढे म्हणाली,"खरे जेंटलमन तेच जे महिलांकडे फक्त सौंदर्याच्या नजरेतून नाही दिव्य नजरेतून पाहतील. दिव्यतेतही ग्लॅमर असू शकतं. ती जीवघेणी आणि ताकदवानही असू शकते. एक महिला अनेक रुपांमध्ये असू शकते."

तमन्ना 'ओडेला २' मध्ये दिव्य शक्तीच्या रुपात आहे. १७ एप्रिल रोजी तो रिलीज होत आहे. चाहते सिनेमाची वाट पाहत आहेत. याच्या पहिल्या पार्टचं नाव 'ओडेला रेल्वे स्टेशन' होतं.

टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूडTollywood