छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ अशा अनेक प्रादेशिक भाषेत आतापर्यंत हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रविचित्र टास्क, स्पर्धकांमधील वादविवाद आणि त्याच सोबत या घरात होणारे काही गौप्यस्फोट यामुळे हा शो कायम टीआरपीमध्ये पुढे असतो. आतापर्यंत या शोमध्ये अनेक स्पर्धकांनी त्यांच्या जीवनाशी निगडीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्येच बिग बॉस तामिळच्या ७ व्या पर्वात प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री विचित्रा हिने हादरवून टाकणारा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.
एकेकाळी तामिळ इंडस्ट्रीमध्ये विचित्राचं नाव टॉप अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जात होतं. परंतु, २० वर्षापूर्वी अचानकपणे तिने इंडस्ट्रीला रामराम केलं. त्यानंतर बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर तिने इंडस्ट्री का सोडली या मागचं कारण सांगितलं आहे. घरातील एका टास्कचा भाग म्हणून तिने तिचा अनुभव शेअर केला.
केरळच्या मलमपुझा येथे एका तेलुगू सिनेमाच्या सेटवर तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर तिने इंडस्ट्री सोडली. एका अभिनेत्यामुळे तिला कास्टिंग काऊचचा भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. तो अभिनेता आता हयात नसल्याचंही तिने सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिने हा किस्सा सांगितला.
नेमकं काय घडलं होतं विचित्रासोबत?
"आता हयात नसलेल्या एका अभिनेत्याच्या विनंतीवरुन मी मलमपुझा येथे चित्रपटात काम करण्यासाठी गेले होते. तिथेच माझी आणि माझ्या नवऱ्याची पहिली भेट झाली. मी शूटिंग दरम्यान ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्याच हॉटेलमध्ये तोही उतरला होता. त्या ठिकाणी मला खूप समस्यांचा सामना करावा लागत होता. त्या चित्रपटाच्या सेटवर मला कास्टिंग काऊचचा सगळ्यात जास्त अनुभव आला. त्यानंतर २००० नंतर मी सिनेसृष्टीतून गायब होण्यामागे ती एकच घटना होती", असं विचित्रा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्या काळात ही घटना फार मोठी झाली होती. अनेक आर्टिकल्स त्यावर छापून आले होते. सिनेमाचं शुटिंग सुरु असताना मी हॉटेलमध्ये गेले त्यावेळी तिथल्या व्यवस्थापनाने त्यांना 'थ्री स्टार दर्जा' मिळाल्यामुळे सगळ्या गेस्टला पार्टी दिली होती. तिथल्या मॅनेजरने ( आता विचित्राचा पती) मला पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. मी तिथे पहिल्यांदाच चित्रपटाच्या हिरोला भेटले. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि 'तू सिनेमात काम करतीयेस का?' असं विचारलं. मी 'हो' म्हटल्यावर. त्याने माझं नाव, मी कोण हे काहीही न विचारता डायरेक्ट मला 'माझ्या खोलीत ये', असं सांगितलं. या प्रकारामुळे मी पुरती हादरुन गेले होते. मी त्या रात्री माझ्या खोलीत जाऊन झोपले.
सेटवर दिला गेला प्रचंड त्रास
त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी मला खूप त्रास द्यायला सुरुवात झाली. शॉट वेळेवर झाले नाहीत. सेटवर अनेक समस्या होत्या. संध्याकाळी ६ नंतर सगळे जण दारु प्यायचे आणि माझ्या खोलीचा दरवाजा ठोठवायचे. आजही दारावरची ती ठकठक माझ्या कानात घुमते. मी रिसेप्शनवर सांगितलं की माझ्या खोलीत कोणतेही कॉल कनेक्ट करु नका, मला एकटं सोडा. मला माझं काम करुन निघायचं होतं. पण तसं झालं नाही आणि दिवसेंदिवस त्रास द्यायचे प्रकारही वाढत होते.
घडत असलेला प्रकार हॉटेल मॅनेजरच्या लक्षात आला आणि त्याने मदतीचा हात पुढे केला. त्याने मला खोली बदलायला मदत केली. इतकंच नाही तर तिथल्या शेड्युलमध्ये त्याने मला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शिफ्ट केलं. काही वेळा मी माझ्या आधीच्या खोलीच्या समोरच्याच खोलीत असायचे. दाराबाहेर मला त्यांचे आवाज ऐकू यायचे. तो त्यावेळी एकटा नसायचा. त्याच्यासोबत अनेक जण असायचे.
दिवसेंदिवस त्रास द्यायचं प्रमाण वाढलं
ते मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करत होते कारण मी त्यांच्या तावडीत सापडत नव्हते. त्यांनी मला धडा शिकवण्यासाठी एका सीन दरम्यान अत्यंत वाईट पद्धतीने स्पर्श केला. एका गावात दंगलीचं दृश्य शूट करायचं होतं. या शूटदरम्यान मला वाईट पद्धतीने स्पर्श करण्यात आला. ज्याने हा स्पर्श केला त्या मुलाला मी स्टंट मास्टरकडे घेऊन गेले आणि तक्रार केली. तर, स्टंट मास्टरने माझा हात झटकला आणि माझ्या कानशिलात लगावली. त्यावेळी कोणीच माझ्या मदतीला आलं नाही. मी त्यानंतर सेटबाहेर पडले आणि चेन्नईतील कलाकारांच्या संघटनेशी संपर्क साधला. पण, त्यांनी तक्रार लिहिण्यास सांगितलं. मात्र, प्रयत्न करूनही त्या लोकांविरोधात काहीही कारवाई झाली नाही. त्यानंतर मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.