तमिळ मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पवन सिंह याचं कार्डियक अरेस्टने शुक्रवारी(१८ ऑगस्ट) निधन झालं. तो २५ वर्षांचा होता. पवन कामानिमित्त मुंबईत स्थायिक होता. पवनने अनेक हिंदी आणि तमिळ मालिकांमध्ये काम केलं होतं. त्याच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्याच्या मृतदेहावर कर्नाटक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पवन हा मुळचा कर्नाटक राज्यातील होता. कामानिमित्त त्याचं कुटुंब मुंबईत स्थायिक होतं. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. कर्नाटकातील मांड्या गावी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या निधनावर तमिळ मनोरंजनविश्वातील सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.
कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना हृदयविकारामुळे मृत्यू ओढावला आहे. कन्नड स्टार पुनीत राजकुमार यांचंदेखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सतिश कौशिक यांनाही हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले. अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाचाही कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. विजय त्याच्या पत्नीबरोबर थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. परंतु, पत्नीच्या निधनाने त्याला जबर धक्का बसला होता. आता अवघ्या २५ वर्षांच्या पवनच्या मृत्यूच्या बातमीने मनोरंजनविश्व हेलावून गेलं आहे.
मांड्याचे आमदार एचटी मंजू, माजी आमदार केबी चंद्रशेखर, माजी मंत्री नारायण गोवडा, माजी आमदार बी प्रकाश, युवा जनता दल स्टेट जनरल सेक्रेटरी नागेश आणि अन्य राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनीही पवनच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.