सिनेइंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलुगुमधील प्रसिद्ध गायिका कल्पना राघवेंद्रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हैदराबादमधील राहत्या घरी तिने सुसाइड करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गायिकेचं घर गाठलं.
मिडिया रिपोर्टनुसार, दोन दिवसांपासून घर बंद असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस गायिकेच्या घरी पोहोचले. मात्र घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे पोलिसांना दरवाजा तोडावा लागला. जेव्हा घराचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले तेव्हा गायिका बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या गायिकेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गायिकेने झोपेच्या गोळ्या खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या गायिका कल्पना राघवेंद्र व्हेंटिलेटरवर आहे. पण, तिच्यावरचं संकट आता टळलं आहे.
कल्पना राघवेंद्र हे तेलुगु इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. ५ वर्षांची असल्यापासूनच तिने करियरला सुरुवात केली होती. २०१० मध्ये रिएलिटी शो जिंकल्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली होती. तिने एआर रहमान, इलैयाराजा यांसारख्या गायकांसोबत काम केलं आहे. बिग बॉस तेलुगु १मध्येही ती सहभागी झाली होती.