अयोध्याराम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली. 500 वर्षांच्या दीर्घकाळ प्रतिक्षेनंतर हा सुवर्णक्षण अनेकांनी अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन झालं. देशभरातील संत महंत, विविध क्षेत्रातील दिग्गजांसह सुमारे ८ हजार लोक आमंत्रित होते. बॉलिवूड कलाकारांशिवाय साऊथ कलाकारांचीही मांदियाळी होती. थलायवा रजनीकांत, रामचरण आणि चिरंजीवी यांची उपस्थिती होती.
अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी रामललाचे दर्शन घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले,"हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि मी खूपच नशिबवान आहे. मी दरवर्षी नक्कीच अयोध्येत येईन." यावेळी रजनीकांत यांच्यासोबत सचिन तेंडुलकरने सेल्फीही घेतला. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रजनीकांत, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे या सोहळ्यात सर्वात समोरच्या रांगेत बसले होते. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
उद्घाटन सोहळ्याला रजनीकांत पांढरा कुर्ता आणि बेज शाल अशा लूकमध्ये दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रजनीकांत यांनी हात जोडून एकमेकांना अभिवादनही केले. अयोध्येत राम मंदिर पारंपरिक नगर शैलीमध्ये बनवलं गेलं आहे. 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंचीचं हे राम मंदिर उभारण्यात आलं आहे. येथे 392 स्तंभ आणि 44 दरवाजे आहेत. स्तंभांवर हिंदू देव देवतांचं नक्षीकाम केलं आहे. बालवयातील प्रभू श्रीरामाची मूर्ती गर्भगृहात स्थापित करण्यात आली आहे.
हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रणबीर कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, जॅकी श्रॉफ, सुभाष घई यांचीही उपस्थिती होती.