सुपरस्टार विजय थलपतीच्या ‘लिओ’ चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. धमाकेदार ॲक्शन आणि अफलातून ड्रामा असलेल्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विजयचा हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र रिलीजपूर्वीच या चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयच्या 'लिओ'ने रिलीजपूर्वीच 400 कोटींची कमाई केली आहे. एवढेच नाही तर 'लिओ'ने जवान, गदर, पठाणचा अॅडव्हान्स बुकिंग तिकिटे विकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारतात आतापर्यंत या चित्रपटाची 1.20 कोटी तिकिटे विकली गेली आहेत.
‘लिओ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं. त्यांनी यापूर्वी 'कैथी', 'विक्रम' आणि 'मास्टर' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘लिओ’मध्ये संजय दत्तशिवाय अनुराग कश्यपही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'लिओ' हा तमिळ चित्रपट आहे. मात्र हिंदीसोबतच इतर अनेक भाषांमध्येही तो प्रदर्शित होणार आहे.
तमिळ चित्रपट विश्वामध्ये थलापती विजयच्या नावाची मोठी क्रेझ आहे. त्यानं गेल्या काही वर्षांपासून ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्याचेही दिसून आले आहे. आता ‘लिओ’ ही धुमाकूळ घालणार हे नक्की, शिवाय हिंदीतसुद्धा हा चित्रपट सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.