Rashmika Mandanna: साऊथ सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी रश्मिका मंदानाने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रश्मिकाच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगमुळे ती 'नॅशनल क्रश' झाली. पण तिला देशभरात खऱी ओळख 'पुष्पा' सिनेमातून मिळाली. व्यावसायिक पातळीवर सध्या रश्मिकाचं करिअर चांगलंच सुरू आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत तिनं 'सिंकदर' चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. आता 'सिंकदर'नंतर रश्मिका मंदाना बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारसोबत झळकणार आहे.
काही दिवसांपुर्वी रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली होती. आता तिच्या दुखापतीत सुधार झाला असून ती कामावर परतली आहे. तिनं तिच्या नव्या सिनेमाचं शुटिंग सुरू केलं आहे. तिचा नवा चित्रपट आहे 'थामा'. या सिनेमात ती अभिनेता आयुषमान खुराणासोबत दिसणार आहे. जानेवारी २०२५ पर्यंत 'थामा' सिनेमाचं काही शुटिंग झालं होतं. पण, तिच्या पायाला दुखापत झाल्यानं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं होतं. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर चित्रपट निर्माते आदित्य सरपोतदार यांनी पुन्हा शुटिंग सुरू केलं आहे.
एप्रिलच्या अखेरीस मुंबईतील शुटिंग पूर्ण केल्यानंतर, टीम मे महिन्यापर्यंत उटीला रवाना होणार आहे. 'थामा' २०२५ च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी २०२४ मध्ये चित्रपटाची अधिकृत घोषणा केली होती. रक्तरंजित प्रेमकथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, नीरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फलारा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.