गेल्या अनेक दिवसांपासून जाईन म्हणत होतो अखेर काल ९ एप्रिलला जाण्याचा योग आला. सिनेमा मल्याळम भाषेत. नाव 'आदुजिविथम'. इंग्रजी नाव 'द गोट लाईफ'. गेल्या काही महिन्यांपासून सिनेमाची जोरात चर्चा होती. जेव्हा 'मंजूमल बॉईज' बघायला गेलेलो तेव्हा 'द गोट लाईफ'चा ट्रेलर मोठ्या पडद्यावर पाहायला मिळालेला. तेव्हाच ठरवलं की, हा सिनेमा तिकिट काढून मोठ्या पडद्यावर पाहायचा. आणि अखेर पाहिला. 'द गोट लाईफ' पाहून इतकंच वाटलं की, असा धाडसी प्रयत्न बॉलिवूड आणि विशेषतः मराठी सिनेमात कधी येणार?
अशी भूमिका साकारायला मोठं धाडस
मूळात विषय असा आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेव्हा सिनेमा पाहतो तेव्हा अभिनेत्याने साकारलेली भूमिका पाहून थक्क व्हायला होतं. साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने नजीबची प्रमुख भूमिका साकारली आहे. नजीबचे आखाती देशात शारीरीक, मानसिक हाल तितक्याच प्रभावीपणे पोहोचवणं गरजेचं होतं. ते काम पृथ्वीराजने व्यवस्थित केलंय. जेव्हा नजीबला काही वर्ष तिथेच राहावं लागतं, आणि नंतर त्याचं बदलणारं बाह्यरुप, शरीराची हाडं होणं हे उत्कृष्टपणे समोर आलंय. काही क्षणानंतर आपण पृथ्वीराज आहे हे विसरुन जातो. साऊथमध्ये पृथ्वीराज हा एक सुपरस्टार नट म्हणून ओळखला जातो. हे स्टारडम बाजूला ठेऊन स्वतःला शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या नजीबच्या भूमिकेत झोकून देण्याचं धाडस पृथ्वीराजच करु शकतो. रापलेला चेहरा, वाढलेली दाढी, केसांच्या जटा अशा अवतारात पृथ्वीराज समोर येऊन उभा राहतो. वाळवंटातल्या प्रखर उन्हात शूटींग करणं हेच मूळात अवघड काम. एका क्षणी काहीही संवाद नसताना शरीर आणि मनाला होणाऱ्या वेदना फक्त डोळ्यांद्वारे आणि किंचाळण्याद्वारे व्यक्त करण्याचं कठीण काम पृथ्वीराजने केलंय. असं धैर्य इतर कलाकारांच्या अंगी खचितच असेल. पृथ्वीराजने हाडांचा सापळा दिसावा इतकं बारीक होण्यासाठी किती मेहनत घेतलीय, हे तुम्हाला इतर बातम्यांमध्ये कळून येईलच.
असा सिनेमा सुद्धा लोकं पाहतात, फक्त तसं मार्केटिंग हवं
९ एप्रिलला नवी मुंबई खारघरला हा शो पाहायला गेले होतो. गुढीपाडव्याची अनेकांना सुट्टी असेल. रात्री ८ वाजता हा शो बऱ्यापैकी भरला होता. अर्थात सिनेमा पाहायला प्रेक्षकांच्या भाषेवरुन मल्याळम भाषिक लोकं जास्त होती. पण माझ्यासारखे 'सिनेमाला भाषा नसते' हे मानणारे काही जण होते. सिनेमा मल्याळम भाषेत असला तरीही सबटायटल वाचून आरामात कळत होता. आणि एका क्षणी संवाद संपून जगण्याची फक्त जीवघेणी धडपड पाहायला मिळते. त्यामुळे हे मोठ्या पडद्यावर अनुभवणं एक मन सुन्न करणारा अनुभव आहे. वाळवंटातील प्रखरता, वैराणपणा जाणवेल इतके आपण या सिनेमाशी एकरुप होतो. या सिनेमात मसाला एन्टरटेनमेंट तसं बघायला गेलं तर काही नाही. पण मार्केटिंग योग्य केल्याने 'द गोट लाईफ' प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.
सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारीत
'द गोट लाईफ' ची कथा थोडक्यात सांगतो... केरळमध्ये राहणारा नजीब हा तरुण. घरची परिस्थिती काहीशी गरीबीची. अशातच दुबईत जाऊन जास्त पैसा कमवून पुन्हा मायदेशी येऊ या हेतून तो भारत सोडतो. पण दुबईत गेल्यावर तिथला ठेकेदार नजीब आणि त्याच्या मित्राला जबरदस्तीने अडकवत त्यांच्याकडे कामाला ठेवतो. मेंढ्यांना सांभाळता सांभाळता नजीब मेंढरांसारखंच आयुष्य जगतो. मग पुढे वाळवंटातून स्वतःची सुटका करुन नजीब भारतात कसा परततो, त्याची कहाणी म्हणजे 'द गोट लाईफ'. या सिनेमाची खास गोष्ट बोलणारी माणसं आणि मुके प्राणी यांच्यातला संवेदनशीलतेमधला विरोधाभास दिग्दर्शक ब्लेसीने चांगला दाखवला आहे. एकूणच तब्बल ३ तासांचा असलेला हा सिनेमा तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन आणि एक उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देईल यात शंका नाही.