Vazhakku Online Controversy : कुठलाही चित्रपट निर्माता/दिग्दर्शक पैसे कमावण्याच्या हेतूने चित्रपटन बनवतो. चित्रपट तयार झाल्यानंतर त्याची पहिली प्राथमिकता चित्रपटाला थिएटर किंवा OTT वर रिलीज करण्याची असते. अनेकदा पायरसी करणाऱ्यांकडून चित्रपट ऑनलाईन लीक केला जातो. पण, जर चित्रपटाच्या दिग्दर्शकानेच चित्रपट ऑनलाईन लीक केला तर? ऐकून आश्चर्य वाटेल, पण अशी घटना घडली आहे. एका दिग्दर्शकाने स्वतःचा चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य पाहण्यासाठी इंटरनेटवर अपलोड करुन टाकला.
दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन (Sanal Kumar Sasidharan) याने त्याचा 'वाझक्कू' (Vazhakku) नावाचा चित्रपट इंटरनेटवर अपलोड केला असून त्याची लिंकही फेसबुकवर शेअर केली आहे. लिंक शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आहे. ज्याला पहायचे असेल त्याला तो पाहता येईल. चित्रपट रिलीज का झाला नाही, हे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल”, असे त्याने लिहिले आहे.
चित्रपटातील हिरोसोबत वाद...सनल कुमारने हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित करण्यामागचे कारण म्हणजे, त्याचा चित्रपटाचा नायक टोविनो थॉमससोबत (Tovino Thomas) झालेला वाद. टोविनो हा चित्रपट प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप सनल कुमारने केला होता. सनलच्या म्हणण्यानुसार, टोविनोला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ द्यायचा नव्हता, कारण टोविनोला भीती होती की, या चित्रपटाचा त्याच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होईल.
दरम्यान, टोविनोने सनलच्या दाव्यांचे खंडन केले आणि सांगितले की त्याने या चित्रपटासाठी पैसेही घेतले नव्हते. उलट त्यानेच स्वतःचे 27 लाख रुपये खर्च केले. विशेष म्हणजे, दोघांमधील हा वाद आताच नाही, तर 2022 सालापासून सुरू आहे. केरळच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. तिथे या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. दरम्यान, वाद वाढल्यानंतर सनल कुमारने चित्रपट इंटरनेटवरुन काढून टाकला, पण तोपर्यंत तो अनेकांनी पाहून डाउनलोड केल्याची शक्यता नाकारता येत नाही.