Join us

१४ दिवसांनी कोमातून बाहेर आला ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलगा, पालकांऐवजी घेतलं विजयचं नाव, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:59 IST

Thalapathy Vijay News: सिनेमांबरोबरच राजकारणात उतरण्याची तयारी करत असलेल्या विजयच्या चाहत्यांबाबतची आणखी एक कहाणी समोर आली आहे. बाहुबली चित्रपटात बिज्जलदेवची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते नासर यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे.  

दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. केवळ दक्षिण भारतातच नाही तर देशातील इतर भागातही त्याचे डबिंग केलेले चित्रपट आवडीने पाहिले जातात. दरम्यान, आता सिनेमांबरोबरच राजकारणात उतरण्याची तयारी करत असलेल्या विजयच्या चाहत्यांबाबतची आणखी एक कहाणी समोर आली आहे. बाहुबली चित्रपटात बिज्जलदेवची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते नासर यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे.

नासर यांनी सांगितले की, ‘’विजय आमच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. १४ दिवस कोमात राहिल्यानंतर जेव्हा माझा मुलगा शुद्धीवर आला, तेव्हा त्याने आपल्या पालकांऐवजी विजयचं नाव घेतलं. विजयच्या चित्रपटांमुळे त्याची प्रकृती सुधारण्यास खूप मदत झाली’’. एका पॉडकास्टमध्ये नासर यांनी त्यांचा मुलगा नुरुल हसन फैजल याच्याबाबत बोलताना विजयशी संबधित ही खास बाब शेअर केली.

ते म्हणाले की, एकदा माझा मुलगा १४ दिवस कोमामध्ये राहिला होता. त्याला १४ दिवस शुद्ध आली नाही. त्याला उपचारांसाठी सिंगापूर येथे नेण्यात आले. मात्र जेव्हा तो उठला तेव्हा त्याने आई-वडिलांना हाक देण्याऐवजी विजयला हाक मारली. या नावाचा त्याचा एक मित्रही आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं, त्याची स्मरणशक्ती नीट आहे. मात्र जेव्हा हा मित्र समोर आला तेव्हा त्याने त्याला ओळखलं नाही.

आमचं कुटुंब गोंधळात पडलं होतं. मात्र आपला मुलगा कुठल्या तरी दुसऱ्याच विजयबाबत बोलत आहे हे  माझ्या पत्नीने ओळखलं. त्यानंतर आम्ही त्याला विजयचे फोटो दाखवले. तेव्हा त्याचा चेहरा खुलला. ही बाब जेव्हा विजयला कळली तेव्हा त्याने मी तुमच्या मुलाला भेटू शकतो का, असं विचारलं. तेव्हा आम्ही काहीच हरकत नाही म्हणत या दोघांची भेट घडवून आणली. त्यानंतर विजय आमच्या मुलग्याला अनेकदा भेटला. त्याने त्याला एक गिफ्टसुद्धा दिले, अशी आठवणही नासर यांनी सांगितली.    

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमा