राष्ट्रीय पुरस्कार विजेता तामिळ चित्रपट 'कदाईसी विवसयी'मध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कसम्मल (Kasammal) यांचं निधन झालं आहे. त्या ७० वर्षांच्या होत्या. मुलाने मारहाण केल्याने कसम्मल यांचं निधन झाल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांंच्या मुलाला अटक केली असून त्याचे नाव पी. नमाकोडी असे आहे.
रिपब्लिकच्या अहवालानुसार, मदुराई जिल्ह्यातील उसिलमपट्टीजवळील अनैयुर गावात कसम्मल यांचा मृत्यू झाला. पैशाच्या भांडणात तिच्या मुलाने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कसम्मल यांच्या मुलाला दारू विकत घेण्यासाठी पैशांची गरज होती पण पैसे देण्यास कसम्मल यांनी नकार दिला. त्यामुळे मुलाने त्यांच्यावर हल्ला केला आणि तिचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आर्थिक बाबींमुळे कसम्मल यांचे त्यांच्या मुलासोबत बऱ्याचदा वाद झाले होते. यामध्येच पुन्हा एकदा पैशांवरुन या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांच्या मुलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्य़ू झाला. रिपोर्ट्सनुसार, कसम्मल यांचा मुलगा गेल्या 15 वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहतोय. त्यामुळे तो आईसोबत राहत होता. मात्र मुलाच्या दारूच्या व्यसनामुळे अनेकदा त्यांच्यात खटके उडायचे.
कसम्मल यांनी तामिळ चित्रपट 'कदाईसी विवसयी' मध्ये अभिनय केला होता. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात विजय सेतुपती, योगी बाबू, नलांदी आणि इतर कलाकार होते. एम मणिकंदानी यांनी 'कडैसी विवसयी'चे दिग्दर्शन केले होते. कसम्मल यांनी चित्रपटात विजय सेतुपतीच्या आईची भूमिका साकारली होती.