कन्नड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री लीलावती यांचं निधन झालं आहे. त्या ८५ वर्षांच्या होत्या. श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एक्सवर ट्वीट करत लीलावती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनीही लीलावती यांना ट्वीटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
लीलावती यांचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील योगदान मोठं आहे. त्यांनी नाटक आणि चित्रपटांत काम केलं होतं. कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा तिन्ही भाषेतील चित्रपटांत काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी ६०० हून अधिक चित्रपटांत काम केलं होतं. 'भक्त कुंभारा', 'संत तुकाराम', 'भक्त प्रल्हाद', 'मांगल्य योग' यासांरख्या चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या दमदार भूमिका अजरामर ठरल्या. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.