Join us

कमी उंचीमुळे अनेकांनी नाकारलं, सेल्समॅनची केली नोकरी; तोच अभिनेता सिनेमासाठी घेतो 21 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 4:04 PM

South actor: अनेक नकार पचवून आज त्याने साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.

आज अनेकांना अभिनेता, अभिनेत्री व्हावसं वाटतं. परंतु, कलाकार होण्याचा हा प्रवास सोपा नाही. कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत, कष्ट करुन, वेळप्रसंगी नकारही पचवून वा अपमान सहन करुन त्यांचं इच्छित ध्येय गाठलं आहे. यामध्ये रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार, नवाजुद्दीन सिद्दीकी असे कितीतरी कलाकार आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. या कलाकारांच्या यादीमध्ये असा एक अभिनेता आहे ज्याला त्याच्या उंची आणि दिसण्यामुळे वारंवार रिजेक्ट केलं. इतकंच नाही तर त्याने सेल्समनचंही काम केलं. मात्र, तोच अभिनेता आज एका सिनेमासाठी जवळपास २१ कोटी रुपयांचं मानधन घेतो.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आज बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहेत. यात प्रामुख्याने रजनीकांत, प्रभास, ज्यु. एनटीआर, महेश बाबू, थलपती विजय आणि विजय सेतुपती यांचा समावेश होतो. परंतु, या प्रत्येक कलाकाराने प्रचंड मेहनत करुन लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे यात विजय सेतुपती याची स्ट्रगल स्टोरी काही वेगळीच आहे. अनेक नकार पचवून आज त्याने साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.

विजय सेतीपुतीने १९९४ मध्ये नम्मावर या सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. परंतु, कमी उंची असल्यामुळे त्याला रिजेक्ट करण्यात आलं. सिनेसृष्टीत वारंवार रिजेक्ट झाल्यानंतर उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न होताच. त्यामुळे त्याने एका रिटेल स्टोरमध्ये सेल्समॅनची नोकरी करण्यास सुरुवात केली. सोबतच एका फास्ट फूड जॉइंटमध्ये त्याने कॅशिअरचंही काम केलं. इतकंच नाही तर त्याने फोनबूथवर ऑपरेटर होणं , सिमेंट बिझनेसमध्ये असिस्टंट अकाऊंटंट अशा कितीतरी लहान मोठ्या नोकऱ्या केल्या.

लहामोठ्या नोकऱ्या करत असतानाच त्याला दुबईला जाण्याची संधी मिळाली. भारताच्या तुलनेत त्याला तिकडे अधिक वेतन मिळत होतं. खांद्यावर भावंडांची जबाबदारी असल्यामुळे त्याने दुबई गाठली. विशेष म्हणजे विदेशात असतानाच त्याची ओळख जेसीसोबत झाली आणि त्यांनी २००३ मध्ये लग्न केलं. काही वर्ष दुबईमध्ये राहिल्यानंतर तो पुन्हा भारतात आला. इथे आल्यावर त्याने एका मार्केटिंग कंपनीत काम करायला सुरुवात केली. एकीकडे नोकरी करत असतानाच तो चेन्नईच्या कुथु-पी-पट्टाराई या थिएटर ग्रुपमध्ये सहभागी झाला. २००६ मध्ये त्याला काही मालिकांमध्ये झळकण्याची संधी मिळाली.

दरम्यान, स्ट्रगल करत असतानाच त्याला २०१० मध्ये रामासामीच्या थेनमेरकु पारवाकात्रु या सिनेमात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेनंतर त्याचं नशीब पालटलं. त्याला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर २०१२ मध्ये त्याचे लागोपाठ तीन सिनेमा सुपरहिट ठरले. त्यानंतर त्याच्या यशाच्या गाडीचा वेग वाढला. आज विजय प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर तो एका सिनेमासाठी तब्बल २१ कोटी रुपये चार्ज करतो. त्यामुळे महागड्या कलाकारांच्या यादीत त्याचा समावेश केला जातो. आज विजय १४० कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.

टॅग्स :Tollywoodसिनेमा