साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती सध्या चांगलाच चर्चेत आहे. विजयने 'जवान', 'मेरी ख्रिसमस' अशा हिंदी सिनेमांमधूनही छाप पाडली. विजय तसा सामाजिक, राजकीय घडामोडींबद्दल कुठेही जाहीरपणे व्यक्त होत नाही. पण नुकतंच २०२४ लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विजयचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्याने धर्माच्या आधारावर मतं मागायला येणाऱ्या लोकांना निवडून देऊ नका, असं आवाहन केलंय.
विजय सेतुपती काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झालेला. यावेळी त्याने तामिळ भाषेत मतदारांना विशेष आवाहन केलं. तो म्हणाला, "प्रिय मतदारांनो, विचार करून आणि नीट पाहूनच मतदान करा. मतदान करणे फार महत्वाचे आहे. जे लोक तुमच्या शहरातील कॉलेज, शाळा आणि मित्रांच्या समस्या सोडवतील त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. अशा लोकांना तुम्ही मत देऊ शकता. मात्र जात-धर्माच्या आधारावर कोणी मते मागितली तर कधीही मत देऊ नका."
विजय सेतुपतीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी त्याने नाव न घेता भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधल्याचा दावा केला आहे. मात्र विजयने बोलताना कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही. सर्वच राजकीय पक्ष सार्वजनिक मते मिळविण्यासाठी धर्माचा आधार घेतात. अशा परिस्थितीत विजयने केवळ भाजपाला लक्ष्य करण्याऐवजी सर्वच पक्षांना उद्देशून लोकांना आवाहन केलं, अशी चर्चा आहे.