केरळमधीलवायनाडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. सोमवारी(२९ जुलै) झालेल्या या दुर्घटनेत अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आत्तापर्यंत २१८ लोकांनी जीव गमावला आहे. तर अद्याप २०६ जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या बचावकार्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. तमिळ सिनेससृष्टीतील सुपरस्टार मोहनलालही या बचावकार्यात सहभागी झाला आहे. तर या दुर्घटनेतील लोकांच्या पुनर्वसनासाठी त्याने ३ कोटींची मदतही जाहीर केली आहे.
दुर्घटना घडलेल्या मुंडक्काई आणि चूरलमाला, पुंचिरीमट्टम या ठिकाणांना मोहनलाल यांनी भेट देऊन पाहणी केली. मोहनलालने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन वायनाड दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. "वायनाडमध्ये झालेली दुर्घटना ही अत्यंत वेदनादायी आहे. यातून सावरायला वेळ लागेल. प्रत्येक घर उद्ध्वस्त होणं आणि जीवन विस्कळीत होणं, ही वैयक्तिक शोकांतिका आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मोहनलाल यांनी त्यांच्या विश्वशांती फाउंडेशनतर्फे तीन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
याबरोबरच मुंडक्काई येथील शाळेची ते पुनर्रचना करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. "माझी १२२ इन्फ्रेंट्री बटालियन, टीए मद्रासचे सैनिक आणि बचाव पथकाच्या साहसी प्रयत्नांना बघणं हे भावनिक होतं. त्यांचं निस्वार्थी समर्पण आशेचा किरण जागृत करते. आपण सगळ्यांनी मिळून हे पुन्हा उभारू", असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
वायनाडमध्ये भूस्खलनाने मोठं नुकसान झालं आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री वायनाडमध्ये अतिवृष्टी आपत्ती ठरली. पहाटे १ ते पहाटे ५ च्या दरम्यान तीन वेळा भूस्खलन झाले आणि डोंगराच्या खाली असलेल्या चेलियार नदीच्या पाणलोटात वसलेल्या चुरामाला, अट्टमला, नूलपुझा आणि मुंडक्काई या चार गावांमध्ये विध्वंस झाला. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला. काही वेळातच शेकडो घरांचे ढिगारे झाले. पुराच्या मार्गात जे आले ते वाहून गेले. झाडेही उन्मळून पडली. गावोगावी मोठमोठे दगड आणि ढिगाऱ्यांचा तडाखा बसला.