साऊथ सुपरस्टार RRR फेम अभिनेता राम चरण (Ram Charan) अतिशय धार्मिक आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचूनही तो आपली मूळ संस्कृती, परंपरा विसरला नाही. रामचरण अनेक धार्मिक रितीरिवाज पाळताना दिसतो. एका विशिष्ट कालावधीत तो अनवाणीही चालताना दिसला आहे. आता नुकतंच रामचरणने मुंबईतील सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. आज सकाळी सिद्धीविनायकाबाहेर या साऊथ सुपरस्टारला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमली.
काळा कुर्ता, काळी पँट आणि खांद्यावर काळ्या रंगाचा गमछा असा त्याचा लुक होता. आज सकाळीच तो मुंबई विमानतळावर दाखल झाला. यावेळी तो चक्क अनवाणी आला होता. रामचरणला याआधीही अनेकदा आपण अनवाणी पाहिले आहे. राम चरण दरवर्षी अयप्पा दीक्षा घेतो. ही ४१ दिवसांची दीक्षा असते आणि त्यानंतर केरळच्या शबरीमला मंदिरात जाऊन अयप्पा स्वामींचे दर्शन घ्यायचे असते. दरम्यान ४१ दिवस तुम्हाला अनवाणी चालावे लागते, काळे कपडे घालावे लागतात, नामस्मरण करावे लागते आणि दर्शनापूर्वी केस किंवा दाढी कापता येत नाही.
आज राम चरणची ही दीक्षा संपली असून त्याने सिद्धीविनायक मंदिरात येऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्याच्यासोबत शिवसेना नेते राहुल कनाल देखील होते. राम चरणचा मंदिरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राम चरण सध्या 'गेम चेंजर' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे. शिवाय रवीना टंडनची लेक राशा थडानीही राम चरणसोबत तेलुगू सिनेमातून डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.