सुपरस्टार थलापती विजय अभिनय आणि दमदार अॅक्शनमुळे ओळखला जातो. 'थेरी', 'मास्टर', 'बीस्ट', 'वरिसू', 'खुशी', 'लिओ' अशा सुपरहिट सिनेमांत काम करून त्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वत:चा दबदबा निर्माण केला. सध्या तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केल्यानंतर आता थलपती विजयने राजकारणात एन्ट्री घेतली आहे.
थलपती विजयच्या राजकारणातील एन्ट्रीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. तो स्वत:चा पक्ष काढणार असल्याचंही वृत्त होतं. आता राजकारणात एन्ट्री घेत थलपती विजयने त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. Xवरुन ट्वीट करत थलपती विजयने याची माहिती दिली आहे. 'तमिलेगा वेट्ट्ररी कझागम' (Tamilaga Vettri Kazhagam) असं थलपती विजयच्या राजकीय पक्षाचं नाव आहे.
"'तमिलेगा वेट्ट्ररी कझागम' या राजकीय पक्षाची आम्ही आज नोंदणी करत आहोत. २०२६मध्ये होणाऱ्या राज्यातील निवडणुका समोर ठेवून आणि त्या पार्श्वभूमीवर हा पक्ष स्थापन केला आहे. या निवडणुकीत यश मिळवून लोकांना अपेक्षित असलेला बदल घडवण्याचं आमचं उद्दीष्ट आहे," असं थलापतीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.