Join us

दीनानाथ नाट्यगृहात रंगतोय अस्वच्छतेचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:37 AM

Me Natyagruha Boltoy Part 3: विलेपार्लेमधील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह मागील ४४ वर्षांपासून नाट्यरसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. नूतनीकरणावर बरेच पैसे खर्च करूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने येथे येणाऱ्या रसिकांना नाईलाजास्तव अस्वच्छतेचा प्रयोग पाहावा लागत आहे.

मी नाट्यगृह बोलतोय भाग ३- संजय घावरे

पार्लेवासीयांचा मनोरंजनाचा कट्टा मानले जाणारे विलेपार्लेमधील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह मागील ४४ वर्षांपासून नाट्यरसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. नूतनीकरणावर बरेच पैसे खर्च करूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने येथे येणाऱ्या रसिकांना नाईलाजास्तव अस्वच्छतेचा प्रयोग पाहावा लागत आहे. या नाट्यगृहाच्या नूतनीकरणावर आजवर बरेच पैसे खर्च केले गेले आहेत, पण टॅायलेटमधील कमोडसोबत असणाऱ्या स्प्रेचं हँडलही जागेवर नसल्याने बऱ्याचदा स्प्रे खालीच जमिनीवर पडलेला असतो. स्वच्छतागृहाचा दरवाजाही लागत नसल्याने स्वच्छतेच्या तीन तेरा वाजले आहेत. महानगरपालिकेतील वरिष्ठांचे नाट्यगृहाकडे दुर्लक्ष असल्याने कर्मचारीही नीट लक्ष देत नसल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा रंगकर्मींकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा सकारात्मक नसल्याचे काही निर्माते नाराज आहेत. निर्मात्यांशी नीट बोलले जात नाही. कामासाठी बराच विलंब होतो असा सूर काही रंगकर्मींसह निर्मात्यांनी आळवला आहे. मार्चमध्ये सिलिंग लीकेज आणि टॅायलेटसंबंधीचे काम केल्याने त्यासंबंधी समस्या दूर झाल्या असून येथे येणाऱ्या रंगकर्मीप्रमाणे सर्वांनाच चांगली वागणूक देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे व्यवस्थापिका ऋजुता फातर्पेकर यांचे म्हणणे आहे.

मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातील सोयीसुविधांबाबत फारशा तक्रारी नसल्या तरी अस्वच्छता आणि काही कर्मचाऱ्यांच्या असमाधानकारक वर्तणुकीचे गालबोट या नाट्यगृहाला लागले आहे. वातानुकूलीत यंत्रणा, खुर्च्या आणि मेकअप रुम्सही चांगले आहेत. प्रशस्त व्हीआयपी रूम आहेत. दोन लेडीज, दोन जेन्टस एसी ग्रीन रुम्स आहेत. अपंगांसाठी वेगळं टॅायलेट आहे. वरिष्ठ नागरिकांना पायऱ्या चढण्यास होणारा त्रास लिफ्टमुळे कमी झाला आहे. पार्किंगसाठी कमी जागा असली तरी पार्किंग फ्री आहे.

मराठी, गुजरातीचा संगम

२१ एप्रिल १९७८ रोजी तत्कालीन महापौर वामनराव महाडीक यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. या सोहळ्याला स्थानिक नगरसेवक नवीनभाई ठक्कर, आयुक्त भालचंद्र देशमुख उपस्थित होते. या नाट्यगृहात ९१६ आसनक्षमता आहे. मराठी नाटकांच्या जोडीला येथे गुजराती नाटके आणि आॅर्केट्राही होतात. चर्चासत्रासाठी १५-२० लोक बसू शकतील असा हॉल आहे. ३०-४० लोकांसाठी बैठक. वाचनालयात नाटकाचे वाचन होते. गाण्यांच्या तालमी होतात.

...तशा फारशा तक्रारी नाहीत - विशाखा सुभेदारया नाट्यगृहात तशा फारशा तक्रारी नाहीत. मेकअप रुम्स टापटीप असतात. येथे नाटक करताना क्रीम ऑडियन्सकडून कशी प्रतिक्रिया येईल, याची मात्र प्रतीक्षा  करावी लागते. रसिक चोखंदळ असल्याने जे आवडते त्यालाच दाद देतात. एकदा एक डाव भटाचा हे नाटक करताना माझा आवाज बसला होता, तेव्हा तो प्रयोग केवळ शांततेत पाहिला नाही तर पिन ड्रॉप सायलेन्स ठेवून ऐकलाही. तिथले प्रेक्षक कलाकारांना सांभाळून घेतात, हे त्या दिवशी कळलं, असे अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने सांगितले. 

अस्वच्छतेच्या मुद्द्याकडे व्यवस्थापनाने लक्ष दिले पाहिजे - जयवंत वाडकररसिकांना नाटकाचा प्रयोग पाहताना कोणताही व्यत्यय येत नाही किंवा कोणतीही समस्या जाणवत नाही. स्वच्छतागृहेही चांगली आहेत.अस्वच्छतेच्या मुद्द्याकडे व्यवस्थापनाने लक्ष दिले पाहिजे. पार्किंगसाठी कमी जागा असली तरी १५-२०  गाड्या पार्क करता येतात. दीनानाथ नाट्यगृह म्हटलं की जुने दिवस आठवतात. तिथल्या कट्ट्यावर सचिन खेडेकरपासून आम्ही सर्वजण जमायचो. मृगजळची अॅक्टिव्हिटी करायचो, असे अभिनेता जयवंत वाडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :नाटकसेलिब्रिटी