संजय घावरे
मी नाट्यगृह बोलतोय (भाग - 1)
मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक खुणांची साक्ष देणारे प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर लवकरच समस्यांच्या विळख्यातून मुक्त होणार आहे. एक ना अनेक समस्यांमुळे नाट्यकर्मींसोबतच रसिकांची नाराजी ओढवून घेतलेले रवींद्र नाट्य मंदिर लवकरच कात टाकणार आहे. १२ कोटी रुपयांच्या प्रस्तावांपैकी सध्या साडे चार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती 'लोकमत'ला मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वीच वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने रवींद्र नाट्य मंदिरातील नाटकाचा शो अर्धवट सोडून रसिकांना तिकिटांचे पैसे परत करावे लागले होते. त्यामुळे रवींद्र नाट्य मंदिरातील असुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घडल्या प्रकारामुळे व्यवस्थापनाची खूप नाचक्की झाली होती. इथल्या समस्यांचा पाढा खूप मोठा आहे. सरकारी यंत्रणेप्रमाणे कामकाज सुरू असल्याचा फार मोठा फटका निर्माते आणि इथे कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या सर्वांनाच बसतो. डीडीने डिपॅाझिट स्वीकारणे, कार्यक्रमानंतर ते परत मिळवण्यासाठी ४५ दिवस प्रतीक्षा करणे, डिपॅाझिट थेट बँकेत जमा न होता त्यासाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी खेपा घालणे हा एक महत्त्वाचा मुद्दा रंगकर्मींसह सर्वांनाचा त्रासदायक ठरत आहे.
मेकअप रूम्स आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था, स्वच्छतागृहाला कडी नाही, दरवाजाचे लाकूड खालून सडलेले असल्याच्या तक्रारी बऱ्याच कलाकारांनी केल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी भिंतींना पोपडे आले असून, आरसेही खराब आहेत. इस्त्रीच्या टेबलावरील कापड मळले आहे. मुंबईतील पालिकेच्या नाटय़गृहांच्या तुलनेत इथे दुप्पट भाडे आकारले जाते. या सर्व कारणांमुळे बऱ्याचदा शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही नाट्यगृह ओस पडलेले असते. नूतनीकरण झाल्यानंतर सुविधांमध्ये सुधारणा होईल. मात्र अन्य सुविधांचा विळखा कधी सुटेल हे सांगता येत नाही. कोट्यवधी रुपये खर्चून केलेले नूतनीकरण रंगकर्मींना किती लाभदायक ठरेल, हे येणारा काळच ठरवेल.
- इतिहास व माहिती :
देशभरातील विविध शहरांमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाने सभागृहांची उभारणी केली जात असताना सुरु झालेले रवींद्र नाट्य मंदिर सुरुवातीला सांस्कृतिक कार्य संचालनाच्या अखत्यारीत होते. काही काळानंतर दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्यामार्फत याचे कामकाज पाहिले जाऊ लागले. १९९१ मध्ये कला अकादमीची स्थापना झाली. १९९३-९४ मध्ये रवींद्र नाट्य मंदिराच्या आवारात कला अकादमी उभारण्याचा निर्णय झाला. १९९७ मध्ये रवींद्र नाट्य मंदिराच्या नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. २००३ मध्ये नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यातील मुख्य नाटयगृहात ९२३, तर मिनी थिएटरमध्ये १९९ आसनक्षमता आहे.
इथेच नाटकाची बाराखडी शिकलो - संतोष पवार (लेखक, दिग्दर्शक, अभिनेता)
रवींद्र नाट्य मंदिर माझ्या घरापासून जसं जवळ आहे, तसंच ते हृदयाच्याही खूप जवळ आहे. इथलं वातावरण छान आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात याच कट्ट्यावर बसून बऱ्याच तालिमी केल्या. इथल्या कट्ट्यावरच मी नाटकाची बाराखडी शिकलो. त्यावेळी खिशात पैसेही नसायचे. तिथल्या डोअरकिपर्सची खूप छान मैत्री झाली होती. ते सांभाळून घ्यायचे. आम्ही नाटकवेडे असल्याचं त्यांना समजायचं. आता इथल्या समस्या कामात व्यत्यय आणतात. कामकाज पूर्णपणे सरकारी असल्यानं हॅाल बूक करण्यापूर्वी डीडी द्यावा लागतो. वर असलेले लहान हॅाल तालिमीसाठी घ्यायचे म्हटलं तर खुर्च्या आणि पंखे भाड्याने घ्याव्या लागतात. जेवण बाहेरून आणता येत नाही. खाली असलेल्या उत्सव हॅाटेलमधून मागवावं लागतं. या गोष्टी रंगकर्मींसाठी खूप त्रासदायक आहेत. तुम्ही एकदम काय ते भाडं घ्या आणि सर्व गोष्टी उपलब्ध करून द्या हेच आमचं म्हणणं आहे. आम्ही कलाकार आहोत. आपली कला सादर करायची की या गोष्टींमध्ये वेळ घालवायचा. याच कारणांमुळं मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असूनही बऱ्याच समस्या असल्यानं निर्मात्यांनी या नाटयगृहाकडे पाठ फिरवली आहे.ृ
आता रवींद्रमधली पॅाझिटीव्हीटी हरवलीय - सुकन्या मोने-कुलकर्णी (अभिनेत्री)
पूर्वीचं रवींद्र नाट्य मंदिर खूप छान होतं. त्याला स्वत:चं एक वेगळं रूप होतं. मधोमध एक कँटीन होतं. तिथे बसून आम्ही जेवायचो. मोकळी जागा होती. तिथे बसायला छान वाटायचं. मुंबई बाहेरून येणारे लेखक, दिग्दर्शक, निर्माते वर असलेल्या खोल्यांमध्ये रहायचे. त्यांच्याशी खूप चर्चा व्हायची. 'दुर्गा झाली गौरी' आणि 'दुर्वा'चे इथे खूप प्रयोग केले आहेत. त्यावेळी मेकअप रुम्स खूप असूनही चांगल्या कंडीशनमध्ये होत्या. राज्य नाट्य स्पर्धा व्हायच्या. त्यामध्ये 'क्षितीज रुंद होत आहे' हे नाटक केलं होतं. त्या काळी हे कामगार भागातील खूप मोठं नाट्यगृह होतं. नारायण सुर्वेंच्या कविता वाचायला मिळायच्या. आताचे मेकअप रुम्स आणि टॅायलेट्स खूप वाईट अवस्थेत आहेत. व्हीआयपी रुमला जाणारा रस्ताही अरुंद आहे. एसी चांगल्या कंडीशनमध्ये नाहीत. मिनी थिएटरमध्ये खूप सुधारणा करायला हवी. मिनी थिएटर आणखी मोठं करायला हवं. जेणेकरून तिथे नृत्य किंवा संगीताचे कार्यक्रम होऊ शकतील. खरं सांगायचं तर आता रवींद्रमधली पॅाझिटीव्हीटीच हरवली आहे.
नूतनीकरणानंतर मार्केटींगही करण्यात येईल - बिभिषण चवरे (संचालक - सांस्कृतिक कार्य विभाग)
नाट्यगृहातील सर्व वातानुकूलित यंत्रणा जवळपास २० वर्षे जुनी असल्याने त्याचे रिप्लेसमेंट केले जाणार आहे. मुख्य नाट्यगृहासह पु. ल. देशपांडे अकादमीमधील फर्निचर, खुर्च्या, कार्पेट, टॅायलेट आदी सर्व जुने आहे. ते नवीन करण्यासाठी एकूण १२ कोटी रुपयांचे प्रस्ताव दिले होते. त्यापैकी साडे चार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यामध्ये नाट्यमंदिर सुसज्ज करण्याची योजना आहे. प्रेक्षागृहांमधील खुर्च्यांपासून टॅायलेटपर्यंत आणि एसीपासून ग्रीनरुम्स, कार्पेट, रंगमंच, मेकअप रुम्स, व्हीआयपी रुम्स, अंर्तबाह्य रंगरंगोटी आणि अंतर्गत सजावटीपर्यंत सर्व कामे केली जाणार आहे. साऊंड सिस्टीमही बदलण्यात येणार आहे. पावसाळ्यात नाटकांचे प्रयोग कमी असतात तेव्हा ऑगस्टमध्ये नूतनीकरणाचे काम हाती घेणार आहोत. नूतनीकरणानंतर नाटयगृहाचे मार्केटिंग करून बिझनेस वाढवण्याच्या मंत्री अमित देशमुख यांच्या आदेशानुसार मार्केटिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.