Join us

म्युझिक कंपन्यांना दर्जेदार गाण्यांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 3:21 PM

नवोदित कलाकारांच्या सिनेमांवरही कंपन्या जास्त पैसे खर्च करत नाहीत. यापेक्षा मिलियन्स फॅालोअर्स असणाऱ्या युट्यूब एन्फ्लुएन्झरवर पैसे लावतात.

संजय घावरे

अर्थाच्या चक्रव्यूहात अडकले गाणे! :  भाग - 2

पूर्वीच्या तुलनेत आज संगीत निर्मिती आणि रसिकांपर्यंत गाणे पोहोचवणे सोपे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाण्यांची निर्मिती होत आहे. म्युझिक कंपन्या मात्र मोजकीच गाणी खरेदी करत असल्याने गाण्यांची संख्या वाढूनही काही नॅान-फिल्मी गायक-संगीतकारांना उत्पन्न मिळनासे झाले आहे. दर्जेदार गाणी घेण्यासाठी म्युझिक कंपन्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून, चांगल्या गाण्यांसाठी कित्येकदा मोठी रक्कमही मोजली आहे. संगीत क्षेत्राच्या या संक्रमणावस्थेतील अवघड काळात संगीत कंपन्या सावधगिरीने पावले टाकत आहेत.

मागील काही वर्षांपासून संगीत निर्मिती आणि विक्रीची प्रक्रिया बदलली आहे. बदल स्वीकारणारे आजही टिकून आहेत. याखेरीज सोशल मीडियाद्वारे नावारूपाला आलेले गायक-संगीतकार आपल्या गाण्यांद्वारे रसिकांवर मोहिनी घालत आहेत. संगीत क्षेत्राच्या या संक्रमणाच्या काळात गाण्यांची संख्या वाढल्याने दर्जेदार गाणी विकत घेण्याचे आव्हान म्युझिक कंपन्यांपुढे आहे. संगणकाच्या मदतीने संगीत निर्मिती सोपी झाल्याने संगीताची बाराखडी माहित नसलेलेही काहीजण गाणी बनवत आहेत. त्यामुळे गाण्यांचा दर्जा खालावत असल्याचे म्युझिक कंपन्यांचे म्हणणे आहे. वर्षाला रिलीज होणाऱ्या अंदाजे १२५ चित्रपटांपैकी सर्वच सर्वांमधील गाणी श्रवणीय नसतात. गाणी विकत घेताना म्युझिक कंपन्या बरेच निकष लावतात. नवीन संगीतकारावर लगेच विश्वास दाखवत नाहीत. आज शब्दांपेक्षा साऊंडचा भाव वधारला आहे. ज्या गाण्यात साऊंडसोबत ऱ्हिदम असतो त्याला प्राधान्य दिले जात आहे. नवोदित कलाकारांच्या सिनेमांवरही कंपन्या जास्त पैसे खर्च करत नाहीत. यापेक्षा मिलियन्स फॅालोअर्स असणाऱ्या युट्यूब एन्फ्लुएन्झरवर पैसे लावतात. कारण त्यांचे गाणे आपोआप मिलियन्स व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचते. कंपनीही गाणे पोहोचवत असल्याने चांगल्या पटीत उत्पन्न मिळेल याची खात्री असते. असे असले तरी आजचा गीत-संगीत निर्मितीचा खेळ शाश्वत राहिलेला नसून, यातून अर्थार्जन होईलच याची खात्री कोणीही देऊ शकत नसल्याचे मत संगीत विश्वातील जाणकार व्यक्त करत आहेत..........................

संगीत विकत घेण्याचे प्रमाण...

वर्षाकाठी बनणाऱ्या १००-१२५ सिनेमांपैकी पहिल्या १० चित्रपटांचे संगीत चढ्या किंमतीला विकत घेतले जाते. त्यापुढील २० चित्रपटांना चांगली किंमत मिळते. यात आणखी १५-२० सिनेमे स्ट्रगल करून थोडेफार पैसे कमावतात, पण उरलेल्या चित्रपटांना वालीच नसतो. दर्जाहिन संगीत कोणीही घेत नाही. अशा चित्रपटांची संख्या खूप आहे. संगीत विकत घेताना संगीताच्या दर्जासोबतच निर्मितीमूल्यांचाही विचार केला जातो.

.......................

यावरही ठरते गाण्याची किंमत...

गीतकार, गायक आणि संगीतकारासोबतच गाण्यात कलाकार कोण आहेत? त्यांचे सोशल मीडियावर किती फॅालोअर्स आहेत? कलाकार स्वतंत्रपणे गाणी कसे प्रमोट करतात? यावरही गाण्याची किंमत ठरते. नवीन कलाकारांची गाणी प्रमोट करताना म्युझिक कंपन्यांच्याही नाकी नऊ येतात. यापेक्षा त्या नामवंत युट्यूबर्सना प्राधान्य देतात.....................

सेलिब्रिटीजनाही मात देतात काही युट्यूटबर्स

टिक-टॅाक बंद झाल्यावर व्हिडिओ बनवणारे बरेच जण बेरोजगार झाले. काहींनी व्हिडीओ बनवून आपल्याच युट्यूब चॅनेलवर प्रमोट केले. यापैकी काहींचे फॅालोअर्स मराठी अॅक्टर्सपेक्षाही खूप आहेत. हे युट्यूब एन्फ्लुएन्झर्स आपल्याच युट्यूब चॅनेलवर गाणी वाजवून पैसे कमावतात, पण त्यासाठी अटींची पूर्तता करणे गरजेचे असते. ज्यांच्याकडून अटी पूर्ण होत नाहीत त्यांना काहीच मिळत नाही.......................

युट्यूबद्वारे उत्पन्न मिळवण्यासाठी...

युट्यूबद्वारे उत्पन्न मिळवण्यासाठी प्रथम वायपीपीला अप्लाय करावे लागते. यासाठी कमीत कमी १००० सबस्क्रायबर्स आणि मागील १२ महिन्यांमध्ये कायदेशीरपणे ४००० तास चॅनेल पाहिले गेलेले असावे. त्यानंतर वायपीपीच्या इतरही अटी पूर्ण केल्यावर जाहिरातींसोबतच चॅनल मेंबरशीप, सुपर चॅट्सद्वारे इन्कम सुरू होते. कॅापी राईटची नोटिस लागल्यास इन्कम थांबवले जाते. गाणे किती वेळ पाहिले यावरही आर्थिक गणित अवलंबून असते........................

युट्यूबकडून असे मिळते उत्पन्न...

दररोज एक हजार व्ह्यूज आणि महिन्याभरानंतर १० हजार सबस्क्रायबर्स झाल्यावर गाणे मॉनिटायझेशनवर टाकता येते. त्यानंतर जाहिराती दिसू लागतात. जाहिरात दिसायला लागल्यावरही दररोज १००० व्ह्यूज मिळणे गरजेचे असते. सुरुवातीला ६०:४० प्रमाणात, लाईक्स आणि सबस्क्रायबर्स वाढल्यावर ७०:३० आणि ८०:२० अशा प्रमाणात उत्पन्न मिळते. दररोज एक हजार व्हयूज मिळाल्यावर महिन्याला अंदाजे १० डॉलर्स मिळतात. ९९९९ सबस्रायबर्स झाले की इन्कम बंद होते. एक लाखापेक्षा सबस्क्रायबर्स झाल्यावर युट्यूबकडून गोल्डन-सिल्व्हर बटण दिले जाते. त्यानंतर युट्यूबकडूनही पैसे मिळू लागतात. सबस्क्रायबर्स आणि लाईक्स टिकवून ठेवले तरच उत्पन्न पुढे सुरू राहते............................

- नानूभाई जयसिंघानी (व्हिडिओ पॅलेस)

आज म्युझिक राईट्स खूप महाग झाले आहेत. म्युझिक खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मागील पाच वर्षांमध्ये म्युझिकचा भाव कमीत कमी तीन पटीने वाढला आहे. चित्रपटांच्या यशाचे प्रमाण वर्षाला केवळ १० टक्के आहे. गाण्यांनाही हेच समीकरण लागू पडते. निर्माता जेव्हा चित्रपट चांगल्या प्रकारे प्रमोट करतो तेव्हाच गाणीही चालतात. युट्यूबच्या तुलनेत स्ट्रिमिंग चॅनल्सकडून चांगले इन्कम मिळते. मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी म्युझिक कंपनीला कोणते ना कोणते गाणे घ्यावेच लागते. गाणी विकत घेतलेला चित्रपट चालला नाही तर नुकसानही सोसावे लागते........................

- चिनार-महेश (संगीतकार)

लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेल्या वेगवेगळ्या पठडीतील काही चित्रपटांचे संगीत रसिकांना आवडले. त्यामुळे संगीतकार म्हणून प्रोत्साहन मिळाले. आज विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सद्वारे जवळपास ८४ ते ९० देशांमध्ये मराठी संगीत पोहोचत आहे. चित्रपटाचा विषय कोणता आहे त्यानुसार संगीतावर किती खर्च करायचा हे निर्माते ठरवतात. नवीन मुलांना युट्यूबने मदतीचा हात दिला असला तरी इथले आर्थिक गणित सर्वांनाच सुटणारे नाही. यासाठी त्या मुलांना सुरुवातीला स्वत:कडचे पैसे खर्च करावे लागतात. त्यानंतर युट्यूबकडून पैसे मिळवण्यासाठी गाणे खूप प्रमोट करावे लागते. उत्पन्न मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो................................ 

- विजय शिंदे (संचालक - अदिती म्युझिक)

कोणतेही गाणे लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते. विविध माध्यमांद्वारे गाणे बूस्ट करावे लागते. याचा फायदा चित्रपटालाही होतो. गाणी लोकप्रिय झाली तर चित्रपटही चांगला बिझनेस करतो. मागच्या वर्षी सुरू झालेली आमची कंपनी फिल्मी आणि नॉन-फिल्मी अशा दोन्ही गाण्यांचे राईट्स घेत आहे. इथले नफ्याचे गणित खूप वेगळे आहे. लगेच उत्पन्न मिळत नाही. संयम ठेवावा लागतो. संयम ठेवणाऱ्यांना चांगले उत्पन्न होत आहे. 

टॅग्स :संगीतसिनेमा