Join us

ऐतिहासिक सिनेमांचे आव्हान मोठे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 5:00 PM

ऐतिहासिक सिनेमा निर्मात्यांना झेपतोय का?

संजय घावरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठी चित्रपट आज बॅाक्स ऑफिसवर गर्दी खेचत आहेत, पण ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचे आव्हान खूप मोठे असते. सर्वसामान्य चित्रपटांच्या तुलनेत पाच ते सहापट बजेट असूनही जर इतिहास दाखवण्यात गफलत झाली तर सर्व मातीमोल होते. रिसर्चपासून व्हिएफएक्सपर्यंत आणि कॅास्च्युमपासून सादरीकरणापर्यंत ऐतिहासिक चित्रपटासाठी लागणारा लवाजमा सोबत घेऊन भव्य-दिव्य दाखवायचे असते.

ऐतिहासिक चित्रपटांमधील भव्यता दाखवताना सेट्स, कॅास्च्युम, शस्त्रास्त्रे, प्राणी, ज्युनियर आर्टिस्ट, व्हिएफएक्स, कास्ट अँड क्रू या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हिंदी-दक्षिणात्य ऐतिहासिक चित्रपटांच्या तुलनेत मराठी ऐतिहासिक चित्रपटांवर जास्त खर्च करता येत नाही. सहा-सात कोटींमध्ये चित्रपट बनवतानाही मर्यादा असतात. रिकव्हरीचे भान ठेवावे लागते. ग्रँजर दाखवण्यासाठी लाईव्ह लोकेशन्स वापरावी लागतात. कितीही चांगले सेटस बनवले तरी ते किल्ल्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे किल्ल्यांवर जाऊन शूट करणे सोयीस्कर ठरते. शूट करताना किल्ल्यांचा पडलेला भाग व्हिएफएक्सद्वारे दाखवता येतो. त्यामुळे पैसेही वाचतात आणि कामही बजेटमध्ये होते. ऐतिहासिक चित्रपटांच्या बजेटमधील मोठा भाग व्हिएफएक्सवर खर्च होतो. व्हिएफएक्सवरील खर्चाला सीमा नाही, पण व्हिएफएक्सवर फार पैसे खर्च न करताही ऐतिहासिक चित्रपट बनवला जाऊ शकतो याचे उदाहरण 'सरदार उधम' हा चित्रपट आहे. जी गोष्ट सांगायची असते ते अॅचिव्ह करण्यासाठी व्हिएफएक्सची गरज भासते. इतिहासाचे पॅशन नसलेल्या दिग्दर्शकाने ऐतिहासिक सिनेमा करू नये असे चित्रपटतज्ज्ञांचे मत आहे. इतिहासाचे वेड नसलेला दिग्दर्शक चांगल्या प्रकारे सिनेमा दाखवू शकत नाही. अशा चित्रपटांसाठी स्वत:च रिसर्च करावा लागतो. स्वत: रिसर्च केल्याशिवाय चित्रपट बनवताना आनंद मिळत नाही. पॅशन असेल तरच त्या क्वॅालिटीचा सिनेमा बनतो असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'बाहुबली १-२'चे बजेट - ४३० कोटी (व्हिएफएक्स ८० कोटी)'तान्हाजी'चे बजेट - १७२ कोटी (व्हिएफएक्स ३० कोटी)'आदिपुरुष'चे बजेट - ५०० कोटी (व्हिएफएक्स २५० कोटी)'ब्रह्मास्त्र'चे बजेट - ५०० कोटी (व्हिएफएक्स ३५० कोटी)'लोकमान्य'चे बजेट - ७ कोटी (व्हिएफएक्स दीड कोटी)

हिंदी-दक्षिणात्य ऐतिहासिक चित्रपटांच्या तुलनेत मराठीचे बजेट ५ ते १० टक्के

सहा कोटी बजेटमधील अंदाजे २० ते ३० लाख कॅास्च्युम खर्च

एका ज्युनियर आर्टिस्टचे दिवसाचे मानधन ७०० ते १५०० रुपये

व्हिएफएक्सवर २-४ कोटींपासून ४००-५०० कोटींपर्यंत खर्च केला जाऊ शकतो

ऐतिहासिक चित्रपटांचे बजेट कॉस्च्यूम, सेटस आणि व्हिएफएक्सवर अवलंबून

ऐतिहासिक चित्रपटांचे बजेट सामान्य चित्रपटांपेक्षा अंदाजे सहा पटीने अधिक

पूर्वीच्या काळी सेट्स पेंट केले जायचे, पण आता व्हिएफएक्समध्ये काम होते

...तर भावना दुखावत नाहीत

'तान्हाजी'मध्ये नायक गाण्यात नाचतो हे लॉजिकद्वारे दाखवले आहे. तान्हाजी मालुसरे कोकणातील होते. तिथे शिमगोत्सवात पालखी नाचवली जाते. त्यामुळे तेही शिमग्याला नाचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे लॅाजिक आहे.

प्राण्यांच्या वापरावर मर्यादा

बैल, हत्ती यांच्यासह काही प्राणी वापरायला परवानगी नसल्याने व्हिएफएक्सद्वारे दाखवले जातात. 'फत्तेशिकस्त'मध्ये हजार बैल दाखवण्यासाठी फायबरचे बैल बनवले होते. घोड्यांच्या वापराला परवानगी आहे, पण तोही खर्चिकच भाग आहे.

गरजेनुसार ज्युनिअर आर्टिस्ट

'बाहुबली'साठी २५०० ज्युनियर आर्टिस्ट सहा महिने पगारावर होते. 'फत्तेशिकस्त'मधील 'रणी फडकती...' या गाण्यात दिवसाला १५०० ज्युनिअर्स, ४०० नर्तक, प्रमुख कलाकार आणि असिस्टंट-क्रू असे २५०० लोक सेटवर असायचे.

शस्त्रांचा वापरही आवश्यकतेनुसार

कथेच्या मागणीनुसार शस्त्रे बनवली जातात. 'फर्जंद'साठी २ हजार शस्त्रे बनवली होती. मराठा शस्त्रांमध्ये २७ प्रकारच्या केवळ तलवारीच आहेत. काही शस्त्रे छत्रपतींनी तसेच योद्ध्यांनीही तयार केलेली आहेत. त्यावरही लाखो खर्च होतात.

...तर कमी होऊ शकतो खर्च

मराठीमध्ये व्हिएफएक्सवरील खर्चलाही मर्यादा आहेत. रिसर्च टीमने चांगले काम केले तर व्हिएफक्सवरील खर्च थोडा कमी करता येऊ शकतो. प्रभावी पटकथा, संशोधक रिसर्च टिम, मार्गदर्शक वर्कशॅाप्स आणि प्रिपरेशनच्या बळावर खर्च वाचू शकतात.

पर्यटन वाढीसाठी पोषक

ऐतिहासिक सिनेमा उत्तम पद्धतीनेच बनवला जावा. कारण तो देशभर पोहोचतो. त्याद्वारे पर्यटनाला चालना मिळू शकते. देशभर पोहोचलेल्या चित्रपटामुळे गड-कोटांवरील पर्यटकांची संख्या वाढते. तिथले स्थानिक व्यवसाय वाढीस लागतात.

महापुरुषांचे दैवतीकरण नको

महापुरुषांचे दैवतीकरण न करता ते तर्कशुद्ध पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवे. त्यांचा प्रयत्नवाद, नीतीमूल्ये, बुद्धीचातुर्य पोहोचले पाहिजे. वाचन संस्कृती कमी होत असल्याने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे चित्रपट प्रभावी माध्यम आहे.

- डॉ. अमोल कोल्हे (अभिनेते, निर्माते)

'शिवप्रताप - गरुडझेप'साठी सात भव्य सेट्स लावले होते. आग्य्राच्या लाल किल्ल्यात अटी आणि नियमांचे पालन करून शूट करताना दुप्पट खर्च झाला. 'गरुडझेप'मागची कारणमीमांसा, मानसिक द्वंद्व आणि जागतिक पातळीवर या मोहिमेचे महत्त्व याचा रिसर्च केला. रक्ताचा एक थेंबही न सांडता बलाढ्य मुघल साम्राज्याला धूळ चारणे हीच महाराजांची 'गरुडझेप' होती. कुठेही काही कमी पडणार नाही या पद्धतीने मांडावे लागले. केवळ इतिहास सांगणे नसावे तर आपण आपल्या वैभवशाली अभिमानास्पद इतिहासाचे वारसदार आहोत या भावनेने कलाकृती बनवली जावी.

- दिग्पाल लांजेकर (लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, गीतकार)

सत्यता खूप महत्त्वाची असते. वास्तवदर्शी चित्र दाखवताना बऱ्याचदा दिग्दर्शकाला नाट्यमय स्वातंत्र्य घेण्याचा मोह होतो, पण मी ठरवले आहे की इतिहास जिथे मुका होतो, तिथेच लिबर्टी घेऊन कथा पुढे न्यायची. कोणत्याही कथेला एक लॅाजिक असते. लिबर्टी घेताना लॅाजिक सुटत नाही याची काळजी घेतली तर चित्रपट कथेच्या बाहेरही जात नाही आणि प्रेक्षकांच्या भावनाही दुखावल्या जात नाहीत. पुरावे, कागदपत्रे उपलब्ध नसतात तेव्हा लॅाजिक सांभाळत लिबर्टी घेतली तर ती कदाचित पोषक ठरू शकते. आपल्या हिरोजना धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतो.

टॅग्स :दिग्पाल लांजेकरसिनेमासेलिब्रिटी