मुंबई - बॉलिवूडची ब्लॉकब्लस्टर मुव्ही ठरलेल्या गदर चित्रपटाचा सिक्वेल आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुन्हा एकदा तारासिंगची लव्हस्टोरी, हिंदुस्थान झिंदाबाद आणि भारत-पाकिस्तानचा संदर्भ घेऊन सनी देओल व अमिषा पटेल मोठ्या पडद्यावर आले आहेत. या चित्रपटातील गाण्यांनीही एकेकाळी वेड लावलं होतं. त्यातच, ट्रॅक्टर आणि ट्रकवाल्यांच्या टेपमध्ये मै निकला ओ गड्डी ले के.... हे गाणं ऐकायला येत होतं. त्याचमुळे, महिंद्रा कंपनीकडून गदर २ साठी सनी देओलला खास गिफ्ट देण्यात आलंय. त्याबद्दल सनीनेही आनंद महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे आभार मानले आहेत.
सनीच्या गुदर २ चित्रपटासह आज अक्षयकुमारचा ओएमजी २ हाही प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही सुपरहिट चित्रपटांच्या सिक्वेलमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मात्र, अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे बघितले तर 'गदर २'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळेच या चित्रपटाची लाखो आगाऊ तिकिटे आरक्षित झाली आहेत. त्याचबरोबर अनेक शो रिलीज होण्याआधीच हाऊसफुल्ल झाले आहेत. पहिल्याच दिवशी दोन्ही चित्रपटांचे एकूण कलेक्शन ४० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यताही ट्रेड तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यातच महिंद्रा कंपनीकडून महिंद्रा ट्रकशी नातं जोडत या चित्रपटाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
देशात 'गदर २' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा उत्सव साजरा होत असताना, मेगा स्टार सनी देओलच्या आयकॉनिक माचो ट्रक ड्रायव्हर तारा सिंगचीही रिएंट्री होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वत्र उत्सवाचं वातावरण आहे, असे महिंद्राने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावर, सनी देओलने महिंद्रा ग्रुप आणि आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर, आनंद महिंद्रांनी तारासिंगची आठवण सांगितली. तसेच, तारासिंगला आपण कसं विसरणार, असे म्हणत सनी देओलला आणि गदर २ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, महिंद्रा कंपनीने मै निकला ओ गड्डी लेके... या गाण्यावर सुंदर व्हिडिओ बनवला, त्याद्वारे शुभेच्छा देत महिंद्रा ट्रकचे प्रमोशनही केले आहे.
गदर अन् लगानचे झाले होते प्रदर्शन
स्वातंत्र्य दिनाच्या पाच दिवसांच्या लाँग वीकेंडमध्ये सनी देओल आणि अक्षय कुमारचे दोन्ही चित्रपट चांगली कमाई करू शकतात, असे मानले जात आहे. जवळपास दोन दशकांपूर्वी याच रिलीज तारखेला थिएटरमध्ये आलेल्या 'गदर' आणि 'लगान' या चित्रपटांनी मोठी कमाई केली होती. त्याचप्रमाणेच 'गदर २' आणि 'ओएमजी २' ही चांगली कामगिरी करू शकतात, असे चित्रपट जगतातील जाणकारांचे मत आहे.