Squid Game season 2: Netflix वर तुफान हिट झालेली दक्षिण कोरियन वेब सिरिज Squid Game चा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. स्क्वीड गेमचा पहिला सीझन जगासह भारतीय तरूणाईमध्ये खूपच लोकप्रिय झाला. या वेब सिरिजला भारतीयांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. आता या वेब सिरिजच्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कटेंट ऑफिसर टेड सारंडॉस यांनी केली. सारंडॉस यांनी याबद्दलची माहिती एका मुलाखती दरम्यान दिली. स्क्वीड गेम 2 ची तयारी आधीच सुरू झाली असल्याचेही त्यांनी सांगितलं.
स्क्वीड गेमच्या पहिल्या सीझनमध्ये दक्षिण कोरियातील लहान मुलांचे खेळ आणि त्याचा मोठ्यांच्या जीवाशी असलेला संबंध याबद्दलची कथा दाखवण्यात आली आहे. कर्जबाजारी झालेल्या काही लोकांना एकत्र करून त्यांच्याबरोबर काही खेळ खेळले जातात. या खेळांमध्ये कोण जिंकतं आणि या खेळात अपयशी ठरणाऱ्यांना नक्की काय शिक्षा दिली जाते? याबद्दलचा हा संपूर्ण पहिला सीझन आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सीझनमध्ये नक्की काय असणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
'स्क्वीड गेम'च्या पहिल्या सीझनचे मोडले विक्रम
स्क्वीड गेमचा पहिल्या सीझन खूपच हिट ठरला होता. पहिल्या सीझनच्या रिलीजनंतर चारच आठवड्यात ही सीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक वेळ पाहिली गेलेली सीरिज ठरली होती. तब्बल १.६५ बिलीयन तास लोकांनी ही सिरीज पाहिल्याचं सांगण्यात आलं होते. त्याआधी, ब्रिजर्टन ही सिरीज सर्वाधिक म्हणजेच ६२५.५ मिलियन तास पाहिली गेली होती. त्याचा विक्रम स्क्वीड गेम सिरीजने मोठ्या फरकाने मोडला. ली जंग-जे, पार्क हे-सू, वाई हा-जून, होयोन जंग, ओ येओंग-सू, हेओ सुंग-ताई, अनुपम त्रिपाठी आणि किम जू-र्योंग यांच्या या वेब सिरीजच्या पहिल्या सीझनमध्ये मुख्य भूमिका होत्या.