बॉलिवूडची हवा-हवाई, ख्वाबो की शहजादी अशा एक ना अनेक नावांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची अकाली एक्झिट प्रेक्षकांना चटका लावून जाणारी होती. त्यांचा २४ फेब्रुवारीला पहिला स्मृती दिन आहे. वयाच्या 54 व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांच्या अभिनयासोबतच त्यांचे सौंदर्य, स्टायलिंग याची नेहमीच चर्चा केली जात असे.
श्रीदेवी सार्वजनिक कार्यक्रमांना पाश्चिमात्य कपड्यांपेक्षा साडीमध्ये हजेरी लावणे अधिक पसंत करत असत. त्यांना त्यांच्या अनेक साड्या प्रचंड आवडत असत. त्यातही त्यांची एक जांभळ्या रंगाची कोटा साडी ही त्यांची अतिशय आवडती होती. ही साडी त्यांनी अनेक वर्षं जपून ठेवली होती. त्यांच्या या साडीचा लिलाव करण्याचे त्यांचे पती बोनी कपूर यांनी ठरवले असून या लिलावातून मिळणारा पैसा चांगल्या कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. या साडीच्या लिलावातून येणारा पैसा कर्न्सन इंडिया फाऊंडेशन या संस्थेला देण्यात येणार आहे. हा लिलाव परिसेरा या वेबसाईटवर होणार असून त्यावर लाईव्ह अपडेट लोकांना कळणार आहेत. लिलावाची रक्कम ४० हजारापासून सुरू होणार आहे.
श्रीदेवी मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या वर्षी दुबईला गेल्या होत्या, त्यावेळी त्या जुमैरा एमिरेट्स टॉवरमध्ये राहात होत्या. याच हॉटेलमधील वॉशरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर डिनरला बाहेर जाणार असल्याने त्या आवरायला वॉशरूमला गेल्या होत्या. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे बोनी कपूर यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडला असता पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी त्यांना दिसल्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी त्यांच्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर त्यांनी ही सगळी माहिती पोलिसांना दिली होती. ही बातमी प्रसारमाध्यमात आल्यानंतर श्रीदेवी यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनाला त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.