जगभरातील सिनेप्रेमींना ‘सदमा’ देऊन गेलेली बॉलिवूडची ‘चांदनी’, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघात नसून खून होता, असा खळबळजनक दावा केरळचे डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंग यांनी केला आहे. डॉ. उमादथन या मित्राच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला. ऋषिराज यांचे मित्र डॉ. उमादथन एक नावाजलेले फॉरेन्सिक सर्जन होते. अलीकडे त्यांचे निधन झाले.डॉ. उमादथन हे गंभीर गुन्हे विशेषत: मर्डर मिस्ट्री उलगडण्यात ‘उस्ताद’ मानले जात. केरळ पोलिसही कुठल्याही हत्या प्रकरणाचा गुंता सोडवता आला नाही की, डॉ. उमादथन यांना बोलवत. फॉरेन्सिक तज्ज्ञ असलेल्या डॉ. उमादथन यांनी अशा प्रकारे अनेक हत्या प्रकरणांची उकल केली होती. याच डॉ. उमादथन यांच्या हवाल्याने आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंग यांनी श्रीदेवींचा मृत्यू हा एक खून होता, असा दावा केला आहे.
युनायटेड न्यूज आॅफ इंडिया (युएनआय)ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. ऋषिराज यांनी हा दावा करताना म्हटले की,‘ मी जिज्ञासेपोटी एकदा माझे मित्र डॉ. उमादथन यांना श्रीदेवींच्या मृत्यूबद्दल विचारले होते. पण त्यांच्या उत्तराने मी हादरून गेलो. मी हे संपूर्ण प्रकरण जवळून पाहिले, असे त्यांनी मला सांगितले होते. यादरम्यान श्रीदेवींचा मृत्यू हा अपघात नाही, अशा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. डॉ. उमादथन यांनी या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यातून हा खून आहे, असे अनेक पुरावे मिळाले होते.’
डीजीपी ऋषिराज यांनी डॉ. उमादथन यांच्या निधनानंतर त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. या लेखात डॉ. उमादथन यांनी सोडवलेल्या अनेक मर्डर मिस्ट्रींचा उल्लेख केला होता. याच लेखात एका कोप-यात श्रीदेवींच्या मृत्यूबाबत त्यांनी दिलेल्या निष्कर्षाचाही उल्लेख होता. ‘कुठलीही व्यक्ती नशेत असली तरी केवळ एक फूट खोल पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये तिचा मृत्यू होऊ शकत नाही,’ असे डॉ. उमादथन यांनी म्हटल्याचे ऋषिराज यांनी आपल्या लेखात नमूद केले होते.
दुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये गतवर्षी24 फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी वा-याच्या वेगाने पसरली होती आणि सगळेच हादरले होते. या मृत्यूची बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. काही जणांनी या मृत्यूबद्दल शंकाही उपस्थित केल्या होत्या. पण त्यावर हळूहळू पडदा पडला होता.