आजच्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवींच्या निधनाची बातमी आली आणि सगळ्यांनाच शोकसागरात लोटून गेली. आजही श्रीदेवींच्या आठवणीने चाहते भावूक होतात. कुटुंबाचे म्हणाल तर अद्यापही बोनी कपूर, जान्हवी, खूशी या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
श्रीदेवी यांनी त्यांच्या निधनाच्याआधी त्यांची शेवटची इच्छा कोणती आहे हे त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांची ही अखेरची इच्छा पूर्ण केली होती.
श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रिय असल्याचे बोलले जाते. अनेक चित्रपटांमध्ये श्रीदेवी पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसून आल्या होत्या. त्यामुळे अंतिम यात्रेला त्यांचे पार्थिव पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवण्यात यावे अशी त्यांची शेवटची इच्छा होती. त्यांची इच्छा लक्षात घेऊन कुटुंबीयांकडून त्यांच्या अंतिम यात्रेची सर्व तयारी करण्यात आली होती. त्यानुसार श्रीदेवींचे पार्थिव ठेवण्यात आले, त्याठिकाणी मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती.
श्रीदेवी यांनी त्यांच्या या शेवटच्या इच्छेविषयी अनेक मुलाखतींमध्ये देखील सांगितले होते. दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्या दुबईमध्ये मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या होत्या. लग्नातील श्रीदेवींच्या मृत्यूपूर्वी काही तास आधीचा व्हिडीओ त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात श्रीदेवी, खुशी कपूर आणि बोनी कपूर यांच्यासोबत दिसल्या होत्या.
श्रीदेवींच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आज जान्हवी कपूर, खुशी कपूर व बोनी कपूर यांच्या चेन्नईतील घरी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.