Join us

श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत दाखल, उद्या होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 9:35 PM

 उद्या बुधवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

नवी दिल्ली - अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीय मुंबई विमानतळावर होते.  उद्या बुधवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत  श्रीदेवी यांच्या मुंबईतील निवासस्थानी हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. वर्सोव्यातील भाग्य बंगला आणि सेलिब्रेशन क्लबमध्ये त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. 

दुबई पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हे पार्थिव मुंबईत आणण्याचा मार्ग मोकळा झाला.  श्रीदेवींच्या मृत्यूनंतर निर्माण झालेलं संशयाचं धुकंही विरलं आहे.  श्रीदेवी यांच्या आकस्मिक झालेल्या मृत्यूची कसून चौकशी केल्यानंतर दुबईच्या सरकारी वकिलांनी श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे सांगत, या प्रकरणाची फाईल बंद केली आहे. चौकशीची प्रक्रिया आटोपल्यानंतर श्रीदेवींचे पार्थिव कपूर कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले.  

शवविच्छेदन अहवालात श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे तसेच त्यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर श्रीदेवींच्या मृत्यूबाबत गुढ निर्माण झाले होते. हे प्रकरण हायप्रोफाइल असल्याने  दुबई पोलिसांनी सखोल तपास करत  श्रीदेवींचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील स्टाफ तसेच पती बोनी कपूर आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर आज दुपारी श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास दुबई पोलिसांनी परवानगी दिली होती. या संदर्भात दुबई पोलिसांनी भारतीय दुतावासाला पत्र पाठवले होते. आता संध्याकाळी सहाच्या सुमारास श्रीदेवींचे पार्थिव घेऊन विमान रवाना होणार असून, हे विमान रात्री नऊच्या सुमारास मुंबईत पोहोचेल.

टॅग्स :श्रीदेवी