Join us

राम चरणच्या एन्ट्रीचं शूटिंग करताना घाबरले होते राजामौली, RRR च्या यशानंतर केला धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 3:36 PM

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'RRR'या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे.

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'RRR'या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या दमदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, राजामौली यांनी नुकतंच या चित्रपटातील शुटिंग दरम्यानचा एक असा किस्सा सांगितला आहे की ज्यानं दाक्षिणात्य स्टार राम चरण याचे चाहतेही घाबरतील. त्यांनी RRRमधील राम चरणच्या एंट्री सीनचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. 

तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला राम चरणच्या एन्ट्री सीन चांगलाच आठवत असेल. पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा असलेला राम चरण आणि त्याच्यासमोर हजारोंचा जमाव. राम गर्दीत घुसतो आणि एक एक करून सगळ्यांची धुलाई करतो, पण यात त्यालाही दुखापत होते. हे अंगावर काटा आणणारं वाढवणारं दृश्य पाहताना तुम्हाला वाटलं असेल की आता हजारो लोकांची गर्दी एकट्या राम चरणवर खूप भारी पडेल. पण तसं होत नाही. राम चरणच्या एका कृतीनं सर्वजण थरथर कापायला लागतात आणि सर्व लोक निघून जातात.

आता राजामौली यांनी याच सीनबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. "अॅक्शन बोलताच १ हजाराहून अधिक लोक राम चरणच्या अंगावर धावून जात होते. अशा स्थितीत तिथं धुळीचं साम्राज्य पसरत होतं. एवढ्या गर्दीत राम चरणाला पाहणं अवघड होऊन जायचं आणि त्यावेळी ते खूप घाबरले होते, पण सुदैवाने ते सुखरूप बाहेर आले", असं राजामौली यांनी सांगितलं. या सुपरहिट सिनेमात राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. राम चरणने अल्लुरी सीताराम राजूची भूमिका साकारली आहे, तर कोमुराम भीमची भूमिका ज्युनियर एनटीआर यांनी केली आहे. अजय देवगणचा कॅमिओ आहे, पण त्याच्या दमदार अभिनयाची छाप चित्रपटात आहे. या चित्रपटात अजय देवगण राम चरणच्या वडीलांच्या भूमिकेत आहे. आलियाचे चित्रपटात सिन्स खूप कमी आहेत. पण सीतेच्या भूमिकेत तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

RRR चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. दक्षिणेत तो यशस्वी झाला आहे, हिंदी सृष्टीतही १०० कोटींचा आकडा पार केला आहे. 'बाहुबली 2' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रमही RRR चित्रपटानं मोडला आहे.

टॅग्स :आरआरआर सिनेमाराम चरण तेजाबाहुबली