RRR Oscar campaign: एस. एस. राजामौली यांच्या 'RRR'च्या नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर जिंकत इतिहास रचला. यानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. आरआरआरच्या टीमने ऑस्कर कॅम्पेनवर ८० कोटी रूपये खर्च करण्याचा दावा करण्यात आला. ऑस्कर सोहळ्याच्या तिकिटांसाठी राजमौलींनी लाखो खर्च केल्याचंही म्हटलं गेलं. आता यावर राजमौलींचा मुलगा एसएस कार्तिकेय यानं उत्तर दिलं आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकेयने या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं.
काय म्हणाला कार्तिकेय...आरआरआर टीमने ऑस्करसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला, या अफवा कुठून आल्या मला माहित नाही. आम्हाला प्रचार करायचा होता आणि आम्ही तो केला. आम्ही सगळं काही प्लानिंगनुसार केलं. ऑस्करसाठी एक ठरलेली प्रक्रिया असते. आम्हीही त्या प्रक्रियेचं पालन केलं. तुम्ही चाहत्यांचं प्रेम खरेदी करू शकता का? तुम्ही स्टीवन स्पीलबर्ग व जेम्स कॅमरूनचे शब्द खरेदी करू शकता का? नाही, हे शक्य नाही. ऑस्कर कॅम्पेनसाठी आमचा बजेट ५ कोटींचा होता. आमच्यासाठी हा बजेटही खूप मोठा होता. आम्ही यातही काटकसर करण्याचाच प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात आम्ही ३ कोटी खर्च केलेत. नॉमिनेशननंतर आम्ही बजेट वाढवला. संपूर्ण कॅम्पेनसाठी ५ ते ६ कोटी खर्च होईल, असं आम्हाला वाटलं होतं. पण हा खर्च ८.५ कोटींवर गेला, असं कार्तिकेयने स्पष्ट केलं.
ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळाल्यापासून ते पुरस्काराची घोषणा होईपर्यंतची प्रक्रिया तब्बल ६ महिने चालते. ‘द अकॅडमी’चे जगभरात जवळपास ६३०० सदस्य आहेत. त्यात भारताचे ५०च्या जवळपास सदस्य आहेत. यामध्ये अर्ध्याहून जास्त सदस्यांची मतं मिळाली म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ऑस्कर मिळतो. ही मतं मिळवण्याची प्रक्रिया मुळीच सोपी नसते. इथल्या प्रत्येक सदस्यापर्यंत आपला चित्रपट पोहोचवावा लागतो. या प्रक्रियेसाठी पीआर संस्थेची मदत घ्यावी लागते. तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही द्यावे लागतात. तुमच्या चित्रपटाचं संपूर्ण भवितव्य पीआर अवलंबून असतं. साहजिकच यावर कोट्यवधींचा खर्च होतो. आपल्या सिनेमाच्या परदेशातील कॅम्पेनसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. हा सगळा खर्च एखाद्या मोठ्या सिनेमाच्या बजेटइतकाही असू शकतो.