Join us

शास्त्रीय संगीतातील तारा निखळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 2:59 AM

निधनाच्या दिवशीच मोतिराम यांची मिर उस्मान अली खान यांच्या कोर्टात राज्याचे संगीतकार म्हणून नियुक्ती होणार होती. जसराज यांचे भाऊ प्रताप नारायण हेदेखील प्रसिद्ध संगीतकार होते.

गायक, संगीतकार, शिक्षक व तबलावादक असलेले पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी हरयाणातील पिली मंदोरी (जिल्हा हिसार, आता फतेहाबाद जिल्हा) खेड्यात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोतीराम हे शास्त्रीय गायक होते. जसराज चार वर्षांचे असताना मोतीराम यांचे निधन झाले. निधनाच्या दिवशीच मोतिराम यांची मिर उस्मान अली खान यांच्या कोर्टात राज्याचे संगीतकार म्हणून नियुक्ती होणार होती. जसराज यांचे भाऊ प्रताप नारायण हेदेखील प्रसिद्ध संगीतकार होते.जसराज यांचे तरूणपण हैदराबादेत गेले व ते मेवाती घराण्याचे संगीत संगीतकारांकडून शिकण्यासाठी वारंवार गुजरातेतील साणंद येथे जायचे. जसराज १९४६ मध्ये कोलकात्याला गेले आणि तेथे त्यांनी आकाशवाणीसाठी शास्त्रीय संगीताचे गायन सुरू केले. १९६२ मध्ये जसराज यांचा मधुरा शांताराम (चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची मुलगी) यांच्याशी विवाह झाला. त्यांना शारंग देव पंडीत हा मुलगा आणि कन्या दुर्गा जसराज ही कन्या आहे. मधुरा जसराज यांनी २००९ मध्ये ‘संगीत मार्तंड पंडीत जसराज’ हा चित्रपट तयार केला होता.जसराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी गायक म्हणून प्रशिक्षण सुरू केले. १९५२ मध्ये त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम नेपाळचे राजे त्रिभुवन बिर बिक्रम शाह यांच्या दरबारात सादर केला.जसराज यांनी अनेक वर्षे आकाशवाणीवर कलाकार म्हणून काम केले. वयाच्या ९० व्या वर्षीही जसराज हे स्काईपच्या माध्यमातून त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिकवत होते.जसराज यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शाळांची अटलांटा, टँपा, व्हँकुव्हर, टोरोंटो, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पिटसबर्ग, मुंबई आणि केरळ येथे स्थापना केली.>जसराज यांना मिळालेले पुरस्कारपद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, स्वाती संगीता पुरस्काराम, संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती, पु. ल. देशपांडे जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, सुमित्रा चरत राम जीवनगौरव पुरस्कार, मारवाड संगीत रत्न पुरस्कार, गंगूबाई हनगल जीवन गौरव पुरस्कार, संगीत कला रत्न, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार.