परदेशी कलाकारांना भारतीय सिनेमाची भुरळ पडणे हे काही नवे नाही. तरीही या कलाकारांना हिंदी किंवा इतर प्रादेशिक सिनेमात फारशी महत्त्वाची भूमिका मिळत नाही. गाण्यात नाचण्यासाठी किंवा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी परदेशी कलाकार घेतले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमात परदेशी कलाकारांना विशेष महत्त्व मिळायला लागले आहे. मराठी सिनेमात या परदेशी कलाकारांच्या वाट्याला महत्त्वाच्या भूमिका येतायत पाहू या कोण आहेत, या फॉरेनच्या अभिनेत्री.पॉला मॅकग्लिन कॅनेडियन अभिनेत्री पॉला मॅकग्लिन ही आगामी ‘पिंडदान’ या मराठी सिनेमात एन्ट्री मारतेय. मूळची कॅनेडियन असली, तरी पॉलाने मराठी शिकण्यासाठी तितकीच मेहनत घेतलीय. देवनागरी भाषेतले उच्चार स्पष्ट व्हावे, यासाठी तिनं गायत्री मंत्राचा जापही केला. त्यावरच ती थांबली नाही, तर पॉलाने या मंत्राचा अर्थही समजून घेतला. सिद्धार्थ चांदेकर आणि मनवा नाईकसह ती ‘पिंडदान’ सिनेमात काम करतेय.स्टॅसी बी परदेशी अभिनेत्रींमधील आणखी एक नाव म्हणजे स्टॅसी बी. ‘मला आई व्हायचंय’ या सरोगसीच्या विषयावर आधारित सिनेमात स्टॅसीने मेरी ही भूमिका साकारली होती.क्रिस्टिन पायस्केर मूळची जर्मनीची असलेल्या क्रिस्टिन पायस्केर हिने ‘पिपाणी’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. या गाजलेल्या सिनेमात क्रिस्टिनने एका परदेशी दिग्दर्शिकेची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या कथेनुसार क्रिस्टिनची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती.सुझान बर्नेट मूळची जर्मनीची आणखी एक अभिनेत्री म्हणजे सुझान बर्नेट. सुझानने आपल्या अभिनयासह डान्सने रसिकांवर मोहिनी घातली. ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या मराठी सिनेमात सुझानच्या लावणीने साऱ्यांची मनं जिंकली. याशिवाय दुसऱ्या जगातील या सिनेमातही सुझानने भूमिका साकारली होती.बिलियाना रॉडनिक मूळची रशियन असलेली बिलियाना रॉडनिक ही मराठी सिनेमात काम करणारी पहिली परदेशी अभिनेत्री आहे. ‘फॉरेनची पाटलीण’ या सिनेमातून तिने मराठीत एन्ट्री मारली. बिलियाणाचा या सिनेमातील अभिनय आणि अंदाज साऱ्यांनाच भावला.
‘फॉरेन’च्या तारका मराठीत
By admin | Published: June 20, 2016 1:48 AM