- अश्विनी भावे/लोकमत एक्सक्लुझिव्ह
नानासाहेब फाटक, केशवराव दाते, व्ही. शांताराम यांच्यापासून डॉ. काशीनाथ घाणेकर, वंदना गुप्ते, निवेदिता जोशी-सराफ अशा असंख्य कलावंतांसाठी तसेच बहुतेक सर्व नाट्यसंस्था आणि चित्रसंस्थांसाठी तब्बल सात दशके रंगभूषाकार म्हणून काम केलेल्या कृष्णा बोरकर यांचे 15 मे रोजी वयाच्या 85व्या वर्षी मुंबईत निधन झाले. अभिनेत्री अश्विनी भावे हिने त्यांच्याविषयीची थेट सान फ्रान्सिस्कोहून लोकमतसाठी जागवलेली याद....
बोरकर काका...
उंच, काळे-सावळे आणि काटक शरीरयष्टीचे. चेह-यावर जाडा चौकोनी काळा चष्मा, पांढरे केस(मी चांदी म्हणत असे त्यांना). चेह-यावर काहीसं मिश्कील, काहीसं कुत्सित हास्य, मी त्यांना भेटले ती 1982साली माझ्या पहिल्याच नाटकात, गगनभेदीच्या वेळी. त्या आधी टाल्कम पावडर व्यतिरिक्त चेह-याला काही लावलं देखील नव्हते. परक्या व्यक्तीनं चेह-याला हात लावणं देखील अजब वाटत होतं. तरीही मेकअप म्हणजे काय याचं अप्रूप होतंच. नोजशेड आणि हायलाइल लावून माझ्या भोंग्या नाकाला त्यांनी धारदार बनवलं तेव्हा ते मला जादूगारच वाटले. त्या नाटकात माझी पहिली एन्ट्री उशिरा होती. त्यामुळे तिस-या घंटेची धामधूम संपली, सगळी पात्रं स्टेजवर गेली की माझा मेकअप चालू व्हायचा. मेकअप कसा करावा, डोळ्यांखालचं काळं कसं लपवावं, गालावर लाली किती माफक लावावी, डोळ्यांचा लायनर कसा लावावा, असं मेकअपचं तंत्र मी नकळत शिकत गेले आणि त्यांना पाहताना काही खूणगाठीही बांधल्या गेल्या असाव्यात. त्यांच्या शार्प रिमार्क्सचा तेव्हा कधी राग आला असेल, कधी भीती देखील वाटली असेल. पण त्यातून अप्रत्यक्षरीत्या व्यावसायिकतेचा अर्थ आपोआप मनावर कोरला गेला.
रंगभूमीवरच्या रंगकर्मींमध्ये एक वेगळीच शिस्त असते, तशीच ती बोरकर काकांमध्ये होती ! प्रत्येक प्रयोगाच्या एक दीड तास आधी येणं, आपल्या ठरलेल्या कोप-यात ठरलेलं सामान, टॉवेलवर ठरल्याप्रमाणे लावणं, कधी उशीर नाही. खाडा नाही, नको ती बडबड नाही. त्यांचं काम संपलं तरी मेकअप रूम सोडणं नाही, तोंड गप्प असलं तरी कान मात्र आतल्या स्पीकरवर. प्रेक्षकांची पहिली टाळी, पहिली दाद ऐकताना नाटक धरलं-रंगलं, याचं अस्पष्ट हासू त्यांच्या चेह-यावर असे. छोट्या मोठ्या, स्त्री-पुरुष, कोणत्याच कलावंतांशी मी त्यांना सलगी करताना पाहिलं नाही. खूप चाललेल्या नाटकाचं अवाजवी अप्रूप नाही किंवा फसलेल्या नाटकाचं अति दुःखही नाही. जसा काही रंगाच्या दुनियेचा रंग त्याच्या अंगाला कधी लागलाच नाही. ब-याच गॅपनंतर, मागल्या वर्षी ते मला अचानक दिनानाथच्या मेकअप रूममध्ये भेटले. मला त्यांना भेटून किती आनंद झाला होता. मी आश्चर्यानं विचारलं, "इथे कसे ? अजून मेकअप करता ?, " ते म्हणाले, "नाही. नाटक पाहायला आलोय". चेह-यावर तेच फिकट हसू, तीच देहयष्टी, तसाच काळा चष्मा आणि "चांदीसारखे केस". माझा पहिला वहिला मेकअप केलेले बोरकर काका माझ्या करिअरचे साक्षी, नकळत बरंच काही शिकवून गेलेले. या मेकअप नसलेल्या मेकअप मॅनला thank you म्हणायचे "दिनानाथ"मधल्या भेटीत राहूनच गेले. मी कधीही आरशापुढे उभं राहिल्यावर ज्यांची हमखास आठवण येईल, त्यांचं अंत्यदर्शनही मी अमेरिकेत असल्यानं घेता आलं नाही. त्यांना माझा सलाम!